मुंबईतील तलावांच्या पाणीपातळीत मोठी वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून जलसाठा सध्या 97.77 टक्‍क्‍यांवर गेला आहे.

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून जलसाठा सध्या 97.77 टक्‍क्‍यांवर गेला आहे. तुळशी, तानसा, मोडकसागर आणि विहार तलाव हे यापूर्वीच भरून वाहू लागले आहेत; तर अपर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने तलावांतील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईला सात तलावांमधून दररोज 3900 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यातील 150 दशलक्ष लिटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. मुंबईला 31 ऑक्‍टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलाव मिळून 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्‍यकता असते. सध्या सातही तलावांत मिळून 14 लाख 15 हजार 20 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. 

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तलावांत 96.30 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी 97.77 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.47 टक्के पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे मुंबईला पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water level increased in mumbai dam