मोेर्बेतील पाणीपातळीत होणार घट

सकाळ वृत्‍तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

यांत्रिकी विभागाकडून पाहणी; लवकरच सांडव्याद्वारे सोडणार पाणी

नवीन पनवेल : पनवेल तालुक्‍यातील गळती लागलेल्या मोर्बे धरणातील पाण्याची पातळी अखेर कमी करण्यात येणार आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने दखल घेतली आहे. त्यानुसार शुक्रवारी यांत्रिक विभागाने त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून; तसेच धरणाला कुठलाही धोका निर्माण होऊ नये याकरिता उपायोजना करण्यात येणार आहे.
परिसरात नागरीकरण झाल्याने शेती क्षेत्र घटले; त्यामुळे जलसिंचनासाठी या जलाशयातून फारसे पाणी वापरले जात नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या धरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. डागडुजीअभावी १०० पेक्षा जास्त ठिकाणी पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे भेगा पडून तडे गेले आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने धरणफुटीचा धोका निर्माण झाला आहे. 

धरणाच्या खाली गाव आणि नागरी वसाहती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत ‘सकाळ’ने ‘मोरबे धरणाला भगदाड’ हे वृत्त ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. या माध्यमातून वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला. अखेर यांत्रिक विभागाने या जलाशयाची पाहणी केली आहे. शुक्रवारी (ता.६) पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे; तसेच इतर अधिकाऱ्यांनी धरणावर जाऊन त्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत पाहणी करून चर्चा केली. या वेळी धरणातील पाणी विसर्ग करून त्याची पातळी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हालचालींना सुरुवात झालेली आहे. डोंगरातून पाण्याचा फ्लो कमी झाल्यानंतर त्वरित मोरीवाटे पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणी सोडण्याकरिता अनेक अडथळे
मोर्बे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याकरिता जो सांडवा आहे, ती अतिशय अरुंद असल्याने पाणी सोडण्याकरिता अडथळे निर्माण होत आहेत. त्यातून वेगाने पाणी येत असल्याने धरणाचा बांध हादरत असल्याचे मोरबे येथील रहिवासी दीपेश साळकर यांनी सांगितले.  

परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
धरणातून पाणी सोडले जाणार असल्याने नदीच्या पात्रात पाणी वाढण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामसेवकांना कळविण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water level in Morbay decreases