दोन दिवसांत सुटणार पाणीप्रश्‍न

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

सिडको अधिकाऱ्यांचे खारघरकरांना आश्‍वासन

खारघर : नवी मुंबई पालिकेकडून मिळणारे पाच एमएलडी पाणी खारघरसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. काळे यांनी दिल्याने खारघरकरांचा पाणी प्रश्‍न मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. पाण्यासाठी खारघरकरांनी बुधवारी (ता. ३०) सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. या वेळी त्यांनी नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले.

या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक गुरुनाथ गायकर, हरेश केणी, माजी उपसरपंच संतोष गायकर, सुदर्शन नाईक, प्रवीण शिंदे, जगदीश घरत, जगन्नाथ निळे यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

खारघर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. खारघरला जवळपास पंचाहत्तर एमएलडी पाण्याची आवश्‍यकता असताना केवळ साठ एमएलडी पाणी उपलब्ध होत असल्यामुळे अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यात दिवाळीत काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांना फराळ आदी विकत आणावा लागला. पाणी समस्येची व्याप्ती वाढत असतानादेखील सिडकोकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याच्या निषेधार्थ खारघरमधील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बुधवारी खारघरमधील सिडको कार्यालयावर सकाळी ११ वाजता हंडा मोर्चा काढण्यात आला. 

या वेळी नवी मुंबई पालिकेकडून मिळणारे पाच एमएलडी पाणी खारघरला दिले जाईल, तसेच कोंढाणे धरणातून पाच एमएलडी पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही धरणांतून १० एमएलडी पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे खारघरची पाणी समस्या दोन दिवसांत दूर होईल असे आश्‍वासन दिले.

आश्‍वासनानुसार सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास तिसऱ्या दिवशी पुन्हा सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. पुढील मोर्चात एक हजारहून अधिक नागरिक सहभागी होतील. त्या वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सिडको जबाबदार असेल.
- गुरुनाथ गायकर, नगरसेवक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Problem to be released in two days