३० वर्षांत मुंबईसह कोकणाला जलसमाधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

अमेरिकेतील न्यू जर्सी येथील क्‍लायमेट सेंटर या संस्थेने जगातील सागरी किनाऱ्यावरील अनेक शहरे २०५० पर्यंत बुडतील अशी शक्‍यता व्यक्त केली आहे.

मुंबई : अमेरिकेतील न्यू जर्सी येथील क्‍लायमेट सेंटर या संस्थेने जगातील सागरी किनाऱ्यावरील अनेक शहरे २०५० पर्यंत बुडतील अशी शक्‍यता व्यक्त केली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि कोकणासह भारतातील अन्य काही शहरांवरही हे जलसंकट येण्याची शक्‍यता आहे.

हिमनग वितळून समुद्राची पातळी दोन ते सात फुटांनी वाढू शकते. येत्या तीन दशकांत किनारपट्टीवर राहणाऱ्या ३४ कोटी नागरिकांच्या घरांना समुद्राच्या भरतीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे.क्‍लायमेट सेंटर संस्थेने ‘नेचर कम्युनिकेशन’ या पत्रिकेत समुद्राच्या पातळीतील वाढ या विषयावरील अहवाल प्रसिद्ध केला आहे. कार्बन उत्सर्जनामुळे हिमनग वितळू लागले असून, समुद्राची पातळी वाढत आहे. आता कार्बन उत्सर्जन आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न झाले; तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

किनारपट्टीवर साचणाऱ्या पाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा तिप्पट वाढत असून, येत्या तीन दशकांत जगभरातील ३४ कोटी नागरिकांची घरे समुद्राच्या भरतीखाली जातील. त्यानंतर ५० वर्षांत ६३ कोटी नागरिकांना हा फटका बसेल आणि २० कोटी नागरिकांची घरे असलेला भूभाग समुद्र गिळून टाकेल, असा इशारा देण्यात आला आहे.
‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही महिन्यांपूर्वी समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे होणाऱ्या परिणामांबाबत अहवाल सादर केला होता. त्या अहवालात नमूद असलेल्या लोकसंख्येपेक्षा किमान तिप्पट नागरिकांना समुद्राच्या भरतीचा फटका बसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.आशिया खंडातील देशांत समुद्र किनाऱ्यानजीक राहणाऱ्या नागरिकांना या घडामोडींचा सर्वाधिक फटका बसणार आहे. 

समुद्रातील प्रकल्प
  छत्रपती शिवाजी महाराज स्मारक
 वरळी ते नरिमन पॉइंट किनारी मार्ग
 वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू
 नरिमन पॉइंट येथील 
थीम पार्क
 मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील थीम पार्क

 

सावटाखाली...
 भारत : मुंबई, नवी मुंबई, कोलकाता
 व्हिएतनाम : हो ची मिन्ह सिटी
 थायलंड : बॅंकॉक
 चीन : शांघाय

या अहवालामुळे जागतिक तापमानवाढीचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. असे अहवाल येत असतात; मात्र मुंबई ३० वर्षांत बुडणार असती, तर तशी चिन्हे आताच दिसू लागली असती; तसे काहीही दिसत नाही. या अहवालामुळे जागतिक तापमानवाढीकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.
- अभिजित घोरपडे, पर्यावरण अभ्यासक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water resources to Mumbai in 5 years