
सहानुभूती नको...पाणी द्या...गायकवाड कुटूंबिय केंद्रीय मंत्री आठवलेंवर संतापले
डोंबिवली - पाणी टंचाईमुळे डोंबिवली देसलेपाडा येथील गायकवाड कुटूंबातील पाच जणांचा संदप येथील खदाणीत बुडून मृत्यु झाला. गायकवाड कुटूंबाची भेट घेण्यासाठी बुधवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले त्यांच्या घरी आले होते. यावेळी आठवले यांनी कुटूंबियांच्या दुःखात सहभागी होत, सहानुभूती दर्शवित 50 हजारांची मदत कुटूंबियांना करणार असल्याचे सुतोवाच करताच गायकवाड कुटूंबातील तरुण संतापले. त्यांनी आठवले यांच्या अंगावर जात आम्हाला सहानुभूती नको, मदत नको...पाणी द्या. पब्लिसिटी मिळविण्यासाठी येण्यापेक्षा आम्हाला पाणी द्या असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला. आमदार, खासदार, मंत्री येऊन गेले, आई, मुले, वहिनी गेली तरी अजूनही घरातील नळाला पाणी आले नसल्याची खंत गायकवाड कुटूंबियांनी यावेळी व्यक्त केली. गायकवाड कुटूंबातील सदस्यांचा रोष पहाता मंत्री आठवले यांनी येथून काढता पाय घेणे उचित समजत दोन मिनीटातच येथून निघून गेले.
डोंबिवलीतील देसलेपाडा येथील पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात असून गावकरी संदप येथील खदाणीवरील पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करतात. याचवेळी एक दुर्घटना घडून पोलिस पाटील सुरेश गायकवाड यांच्या घरातील पाच जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या निमित्त गायकवाड कुटूंबियांची भेट घेण्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले बुधवारी डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांनी मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर गायकवाड कुटुंबियांना मुख्यमंत्री फंडातून मदत निधी मिळावा यासाठी पत्रव्यवहार करु तसेच आरपीआयच्यावतीने 50 हजाराची मदत आम्ही गायकवाड कुटूंबियांना देत आहोत असे आठवले म्हणताच...गायकवाड कुटूंबातील तरुण मंडळी संतापली. त्यांनी थेट आठवले यांना विरोध करीत आम्हाला मदत नको, आमची माणसे भरुन देणार आहात का? ते पुन्हा येणार आहेत का? असा सवाल केला. यावर आठवले म्हणाले, समाजाचा एक नेता म्हणून या दुःखात सामील होण्यासाठी येथे आलो आहे, राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. गायकवाड कुटूंबियांचे दुःख आमच्या शब्दाने कमी होणार नाही, त्यांची होणारी चिडचिड याची मला पूर्ण जाणीव आहे. गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी बोलून प्रयत्न करेल असे सांगितले.
यावेळी चिडलेले सुरेश गायकवाड यांनी देखील आपली चिड व्यक्त करताना आमची पाच जीव गेली आहेत, दुसऱ्यांना तरी वाचवा त्यासाठी तरी पाणी द्या अशी भावना पोट तिडकीने व्यक्त केली. पुन्हा घटना घडणार नाही याची दक्षता घ्या खदाणी बंद करा. बोलून, चर्चा करुन काय करणार आहेत, खासदार आमदार येऊन गेले कोणी पाणी दिले नाही. आजही आम्ही पाणी विकत घेतोय. आम्हाला देणगीची नाही तर पाण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
संभाजी राजेंनी भाजपमध्ये रहावे...
संभाजी राजे शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याबाबत केंद्रीय मंत्री आठवले यांना विचारले असता, संभाजी राजेंनी सेनेमध्ये जाऊ नये, त्यांना सहा वर्षासाठी भाजपने राज्यसभा दिली होती. त्यांनी भाजप मध्ये राहिलं पाहिजे असा सल्ला दिला. तसेच त्यांना कोणत्या पक्षात जायचं असेल तर त्यांना तो अधिकार असल्याचे देखील आठवले म्हणाले, पण त्यांना शिवसेना राज्यसभा देत असेल तर ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अस सुतोवाच देखील त्यांनी केले.
Web Title: Water Scarcity Five Members Gaikwad Family Drowned Ramdas Athawale Dombivali
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..