दिव्यात पाणी प्रश्‍नाचे चटके तीव्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

सगळेच गोड बोलतात...
दिव्यात एक वर्षापूर्वी राहायला आलो. त्या वेळी परिस्थिती माहीत नव्हती. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले; मात्र नंतर बांधकाम व्यावसायिकाने हात वर केले. त्यानंतर पाण्यासाठीची वणवण सुरू झाली. घर विकताना गोड बोलणारा बांधकाम व्यावसायिक आता कानावर हात ठेवतो.
- नीलिमा परब, गणेशनगर, दिवा

ठाणे : पिण्याच्या पाण्यासाठी पहाटेपासून अबालवृद्धांची सुरू असलेली धावपळ, तलावाच्या काठावर कपडे धुण्यासाठी महिलांची झालेली गर्दी, पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची वर्दळ हे विदारक चित्र एखाद्या दुर्गम गावातले नसून मुंबई, ठाणे या महानगरांच्या कुशीत वसलेल्या दिवा शहराचे आहे. उन्हाच्या झळा तीव्र होत असताना या शहरातील पाणी टंचाई अधिक उग्र होणार असल्याने तर रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विशेष म्हणजे, "पैसे द्या, पाणी घ्या...' अशी जाहिरात इथेच पाहायला मिळते. अशा या दिव्यातील रहिवाशांच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नावर टाकलेला हा प्रकाशझोत...

ठा णे महापालिका क्षेत्रातील दिवा हे सुमारे चार ते साडेचार लाख लोकवस्तीचे शहर. उंच उंच इमारती, नियोजनाचा अभाव आणि बेकायदा बांधकामांनी ग्रासलेल्या या शहराची लोकसंख्या वाढीचा वेग पाहता लवकरच पाच लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत त्याचा समावेश होणार हे नक्की. सध्या या शहरात पाणी प्रश्‍नाची दाहकता तीव्र आहे. 10 वर्षांपूर्वी जेवढे पाणी दिव्याला देण्यात येत होते, त्यामध्ये फारशी वाढ करण्यात आली नसल्याने हे संकट तीव्र झाले आहे.

दिव्यात बेकायदा घरांची संख्या लक्षणीय आहे. ही घरे आज ना उद्या अधिकृत होतील, या आशेने अनेकांनी आयुष्यभराची कमाई येथील घरात गुंतवली आहे; पण पाणी टंचाईच्या संकटामुळे ते आता मेटाकुटीला आले आहेत. बहुसंख्य वस्ती पाणथळ, खार जमिनीवर असल्यामुळे भूगर्भातील पाणी खारट असते. त्यामुळे कुपनलिका खोदून त्याचा काहीही उपयोग होत नाही. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हरी ओम सोसायटीतील अनिता कदम या गृहिणीला तिसऱ्या मजल्यावर पाणी घेऊन जावे लागते. त्यामुळे तिच्या मणक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. त्या पाठदुखीने हैराण आहेत. दोन मुलांची जबाबदारी अनिता यांच्यावर आहे. या परिस्थितीत त्यांना आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
पाण्यासाठी शहरातील हजारो महिलांना वणवण करावी लागत असल्याने अनिता यांच्याप्रमाणेच त्यांनाही अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे.
पतीच्या आजारपणात उपचारांसाठी झालेल्या खर्चात अनिता यांना घरातील सोन्याचे दागिने विकावे लागले. याच दरम्यान त्या राहत असलेल्या हरी ओम सोसायटीला थकीत पाणीपट्टीचे बिल तीन लाख 36 हजार 642 रुपये आले. त्यानंतर त्यांच्या घराचे बजेट बिघडले. अनिता यांच्याप्रमाणेच अनेकांना पाणी बिलाचे चटके सहन करावे लागले आहेत.
.......................
पाण्याचे बिल तीन लाख रुपये
दिवा पूर्वेकडील हरी ओम सोसायटीत चार दिवसांतून अर्धा तास पाणी येते. गेली अनेक वर्षे या ठिकाणी अशीच स्थिती आहे; पण थकबाकीसह पाणीबिल तीन लाखांपेक्षा अधिक झाल्याने सोसायटीची पाण्याची जोडणी कापण्यात आली. सोसायटीच्या टाकीत पाणी चढवण्याच्या मोटारीही काढून नेण्यात आल्या. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागतो. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा व्हावा, याकरता रहिवाशी वर्गणी गोळा करतात.
....
आर्थिक भार मोठा
टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत असला, तरी आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नाही. 250 रुपयांमध्ये 500 लिटर, तर 500 रुपयांमध्ये हजार लिटर पाणी मिळते. 20 लिटरच्या पिण्याच्या पाण्यासाठी 60 रुपये ते 70 रुपये रहिवाशांना द्यावे लागतात. त्यामुळे त्यांच्यावर जीवघेण्या त्रासाबरोबरच अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
...........................
जलवाहिन्यांचे जटील जाळे
दिवा शहराच्या पाणीपुरवठ्याची किती बिकट स्थिती आहे, हे शहरात प्रवेश केल्यानंतर दिसते. मुख्य रस्ते, गल्ल्या, पायवाटा, गटारे, मोठे नाले अशा सगळीकडे प्लास्टिकचे आणि लोखंडी पाईपांचे जाळे आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांना छिद्र पाडून जलवाहिन्या जोडल्या आहेत. प्लास्टिकच्या काळ्या जलवाहिन्यांचा तर विळखा आहे.
......
टंचाईचे चटके तीव्र
शहरातील पाणी टंचाईची माहिती घेत असताना मुख्य जलवाहिनीच्या मागच्या बाजूला एका ठिकाणी काही रहिवाशी पाहणी करताना दिसले. त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली, त्या वेळी पाणी टंचाईचे चटकेच रहिवाशांना या ठिकाणी घेऊन आल्याचे दिसले. या जलवाहिनीवरून काही रहिवाशांनी बेकायदा नळजोडणी घेतल्या होत्या. त्यावर महापालिकेने कारवाई केल्याने रहिवाशी गोळा झाले होते.
..........
दूषित पाण्याचा प्रश्‍न
दिव्यात पाण्याची तीव्र टंचाई आहे; पण त्याचबरोबर दूषित पाण्याचा प्रश्‍नही गंभीर आहे. नाल्यातून जलवाहिन्या टाकण्यात आल्या असल्याने फुटलेल्या जलवाहिन्यांमध्ये दूषित पाणी घुसत आहे.
.....
लोकप्रतिनिधींची पाठ
दिव्याला ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मोठे महत्त्व आले होते. पूर्वी या शहरातील अवघ्या दोन नगरसेवकांना प्रतिनिधित्व करता येत होते. ती संख्या या वेळी 11 झाल्याने सगळ्याच राजकीय पक्षांनी या शहराकडे धाव घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी प्रचार केला. विशेष म्हणजे, प्रचारादरम्यान नेत्यांनी येथील समस्यांची जाणीव असल्याचे स्पष्ट केले होते; पण नंतर त्यांनी पाठ फिरवली आहे. दिव्याला न्याय देण्यासाठी या परिसरातील नगरसेवकाच्या गळ्यात उपमहापौरांची माळदेखील घातली; पण पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे व्यापक प्रयत्न होताना दिसत नाही.
..............

बेकायदा बांधकामांचे दुखणे...
बेकायदा बांधकामांची कीड लागलेल्या या शहरात स्वस्तात घर मिळत असल्याने येथील लोकवस्ती वाढली. तुलनेने पायाभूत सुविधा मात्र या भागात नाहीत. या भागात नियमित पाणी पुरविले जाते, असे महापालिकेचे आकडे सांगतात. काही भागात पाणी आहे; मात्र जुनाट जलवाहिन्यांमुळे ते घरापर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुंब्रा कॉलनी, प्रेरणा टॉवर, बेडेकरनगर, दुर्गानगर, दिवा साबे गाव, ओंकारनगर आदी परिसरात पाण्याची फारच वानवा आहे. गणेशनगर तलावाच्या आजूबाजूच्या चाळीतील लोक येथील पाणी भरून घरी घेऊन जातात. तलावातून दोन हंडे किंवा बादल्याच पाणी मिळते. उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्यानंतर तलाव आटणार हे नक्की. त्यामुळे त्यानंतर काय करणार? असा प्रश्न आहे.
......
15 कुपनलिका आहेत; पण...
दिवा रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेकडे एकाच ठिकाणी 15 कुपनलिका आहेत; पण त्यांना खारे पाणी आहे. त्यामुळे या पाण्याचा कपडे धुण्यासाठीही उपयोग होत नाही.

गुंडांची भीती
शहरात टॅंकरमाफियांच्या गुंडांची दहशत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाणी टंचाईबाबत जाब विचारणाऱ्या रहिवाशांचा पाणीपुरवठा बंद होतो, असे काही रहिवाशांनी सांगितले.
........
रूळांखालून पाईपलाईन
मुंबईची लाईफलाईन असलेल्या उपनगरी रेल्वे रूळाखालून जलवाहिनी टाकण्याचा प्रताप दिव्यातील काही महाभागांनी केला आहे. जलवाहिनीसाठी रूळाखालील खडी काढण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे.
......
पाणी चोरीचा प्रकार तेजीत
मुख्य जलवाहिनीतून पाणी चोरी तेजीत आहे. या चोरांवर ठाणे महापालिकेकडून वारंवार कारवाई करण्यात आली असली, तरी ते स्थानिक प्लंबरच्या मदतीने चोरी करतात.
.......................................
शेअर रिक्षा तेजीत
दिवा स्थानक परिसरातील महिलांना कपडे धुण्यासाठी गणेश तलावाच्या पाण्याचा आधार आहे. या महिला कपडे धुवायला शेअर रिक्षाचा पर्याय निवडतात.
......

टॅंकरमाफियांची दहशत...
पाणी टंचाईमुळे रहिवाशांना टॅंकरद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याशिवाय पर्याय नाही. हे पाणी आगासन भागामधून येते, असे सांगण्यात येत असले तरी ते नक्की कोठून आणतात? असा प्रश्न रहिवाशांना सतावत आहे. टॅंकरच्या 500 लिटर पाण्यासाठी 250 रुपयांचा दर आहे. काही टॅंकरमाफिया स्वत:च्या विहिरी आणि कुपनलिका असल्याचा दावा करत असले, तरी पाणी चोरी काहींचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात येते.
.....

"डाएल ए टॅंकर'ची चलती
गाडीत हजार लिटर पाण्याची टाकी आणि पंप, असे चित्र शहरात ठिकठिकाणी पाहण्यास मिळते. या टाक्‍यांमधून इमारतीच्या कोणत्याही मजल्यावर पाणीपुरवठा करण्याचे काम अत्यंत कौशल्याने टॅंकरचालक करतात. या गाड्यांवर आकर्षक पद्धतीने "पाण्यासाठी फोन करा...' अशी पोस्टर्स लावलेली आहेत. दर्शना वॉटर सप्लाय, ओंकार वॉटर सप्लाय, परी वॉटर सप्लाय, वेदांत वॉटर सप्लायर्स, अशा वेगवेगळ्या नावाचे हे पाणीपुरवठा करणारे आहेत. काही टॅंकरचालक, मालकांची दादागिरी आहे. त्यांच्याविरोधात बोलण्यासाठी हिंमत कुणाचीही नाही. विशेष म्हणजे, सामाजिक क्षेत्रातील मंडळीही याविषयी बोळण्याचे टाळतात.

सगळेच गोड बोलतात...
दिव्यात एक वर्षापूर्वी राहायला आलो. त्या वेळी परिस्थिती माहीत नव्हती. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले; मात्र नंतर बांधकाम व्यावसायिकाने हात वर केले. त्यानंतर पाण्यासाठीची वणवण सुरू झाली. घर विकताना गोड बोलणारा बांधकाम व्यावसायिक आता कानावर हात ठेवतो.
- नीलिमा परब, गणेशनगर, दिवा
 

तेलाप्रमाणे पाणी वापरतो...
उन्हाळा सुरू झाल्यापासून घरामध्ये पाणी नाही. त्यामुळे कपडे धुण्यासाठी वणवण करावी लागते. बाटली बंद पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करावा लागतो. स्वयंपाक करताना पाणी जपून वापरावे लागते.
- सरिता भोईर, साबेगाव, दिवा

दिवा स्थानकावर दिवा पॅसेंजर गाडी रात्रभर असते. या गाडीतील स्वच्छतागृहासाठीचे पाणी नाईलाज म्हणून आणतो. पाण्यासाठी आम्ही काय काय वणवण केली नाही, हे सांगतानाही आमच्या डोळ्यात पाणी येते.
- शोभा सानप, गृहिणी

डिसेंबर सुरू झाल्यापासून पाण्यासाठी वेगळा खर्च राखून ठेवतो. पाण्यासाठी दर महिन्याला दोन ते तीन हजारांहून अधिक खर्च होतो.
- संगीता भेंडे, गृहिणी, सदगुरूनगर.

( संकलन - श्रीकांत सावंत, हर्षदा परब, किरण कारंडे )

Web Title: water scarcity issue in dive, mumbai