जलाशय भरले, पण हंडे रिते 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करणारे जलाशय पूर्णपणे भरल्यानंतरही उन्हाळ्यात केलेल्या 10 टक्के पाणीकपातीचा सिडको प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे ऐनपावसाळ्यातही सिडको वसाहतींमधील रहिवाशांना कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. 

नवी मुंबई - सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करणारे जलाशय पूर्णपणे भरल्यानंतरही उन्हाळ्यात केलेल्या 10 टक्के पाणीकपातीचा सिडको प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे ऐनपावसाळ्यातही सिडको वसाहतींमधील रहिवाशांना कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. 

पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोकडे स्वतःच्या मालकीचे जलसाठे नसल्यामुळे सिडकोला आजही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंपदा विभाग, एमआयडीसी, नवी मुंबई महापालिका अशा विविध सरकारी संस्थांच्या जलसाठ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. पनवेल महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सिडकोच्या नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली कॉलनी, खारघर व कामोठे येथील भागाला विविध जलसाठ्यांमधून पाणी घ्यावे लागते. जलसंपदा विभागाच्या हेटवणे धरणातून सिडकोसाठी 350 एमएलडी पाणी साठा आरक्षित केला आहे; मात्र त्यापैकी 150 एमएलडी पाणीपुरवठा घेऊन खारघर नोडला दिला जातो. अतिरिक्त पाणीपुरवठा पाटपंधारे विभागाकडून घेऊन उलवे व द्रोणागिरी येथील रहिवासी वस्त्यांना 35 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. याव्यतिरिक्त नवीन पनवेल, कळंबोली व खांदा कॉलनी येथील भागाला 65 एमएलडी पाणीपुरवठा पाताळगंगा नदीतून एमजेपीतर्फे घेतला जातो; तर कामोठे येथील भागाला 40 एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणातील पाणीसाठा वापरला जातो, परंतु मे महिन्याच्या काळात सिडकोला पाणीपुरवठा करणाऱ्या या सर्व जलाशयांनी तळ गाठल्यामुळे सरकारतर्फे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना 10 टक्के पाणीकपातीचे आदेश दिले होते. त्यानुसार सिडकोच्या वसाहतींमध्येही नेहमीपेक्षा 10 टक्के पाणीकपात करूनच पाणीपुरवठा केला जात होता, परंतु आता जून व जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे हेटवणे धरण 78 मीटरपर्यंत भरले आहे; तर पाताळगंगा नदीही ओसंडून वाहत आहे. नवी मुंबईचे मोरबे धरणही भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाही उन्हाळ्यातील 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात सिडको प्रशासनाला विसर झाला आहे. 

कमी दाबाने पाणीपुरवठा 
नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी येथे 10 टक्के पाणीकपातीमुळे आजही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. या भागांमध्ये सिडकोतर्फे सकाळी व संध्याकाळी दोन तास पाणीपुरवठा केला जात आहे, परंतु कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे तिसऱ्या मजल्यापासून वरच्या इमारतींमध्ये पाणी वर चढेपर्यंतच दोन तास पूर्ण होतात. त्यामुळे दोन मजल्यांपासून वरील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. 

Web Title: water shortage in CIDCO Colony