पाण्यासाठी वीजतोडीचा तोडगा!

अनिल चासकर / अक्षय देठे
बुधवार, 22 मे 2019

लहान मुलेही पाण्याच्या रांगेत
झोपडपट्ट्यांमधली परिस्थिती भयावह आहे. रहिवाशांना पिण्याचे पाणी विकत आणावे लागत आहे. वस्त्यांमध्ये रात्री पाणी येत असल्याने कामावरून आल्यानंतर अख्खे कुटुंब नळासमोर रांग लावत असल्याचे चित्र आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना पाणी भरण्यासाठी जुंपावे लागत आहे.

मुंबई - कांदिवलीच्या चारकोप परिसरात म्हाडा इमारतींबरोबरच खासगी वसाहतींना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये विविध कारणांमुळे पाणी कमी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तर घरगुती मोटारी बंद पडाव्यात म्हणून इमारतीची वीजच बंद केल्याने रहिवासी उकाड्याने होरपळत आहेत. झोपड्यांमध्ये अवैध जोडण्या घेण्यात आल्यामुळे म्हाडा इमारतींमधील रहिवाशांना कमी पाणी मिळत आहे.

कांदिवली-चारकोप विभागात विविध कारणांमुळे पाणीटंचाई भेडसावत आहे. चारकोप परिसरातील म्हाडा वसाहतींमधील अनेक सोसायट्यांच्या जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवाशांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. चारकोपच्या म्हाडा वसाहतीत एकूण नऊ सेक्‍टर आहेत. बहुतेक कुटुंबे नोकरदार आहेत; पण दुपारी पाणी येत असल्यामुळे त्यांची सकाळी कामाच्या घाईच्या वेळी अडचण होते. त्यामुळे अनेकांना पाणी विकत घेऊन गरज भागवावी लागत आहे. गृहिणींचा सर्वाधिक वेळ पाणी भरण्यातच जात आहे. त्यामुळे अनेक वर्षे एकत्र राहिलेल्या कुटुंबामध्येही पाण्यावरून वाद होत आहेत. घरात पाण्याची मोटार लावण्यावरूनही भांडणे होत आहेत. परिणामी अनेक सोसायट्यांनी पाण्याच्या वेळात वीज बंद करण्याचा ठराव केला आहे.

त्यामुळे पिण्याचे पाणी तरी मिळते, असे २० वर्षांपासून राहणाऱ्या अक्षता शिंदे यांनी सांगितले. मात्र, वीज बंद झाल्याने टीव्ही, वातानुकूलित यंत्रे, पंखे, मिक्‍सर आदी वस्तू बंद पडत असल्याने सर्व व्यवहारही ठप्प होत आहेत. अनेक सोसायट्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून दीड ते तीन हजार खर्च करून टॅंकर मागवत आहेत. म्हाडा वसाहतीत हल्ली तासभरच पाणी येते. तेही कमी दाबाने येत असल्याने घरच्या पोटमाळ्यावरील टाकीही भरत नाही. त्यामुळे रहिवासी बादली, हंडे, पातेली, गॅलन, कॅन आदी जे मिळेल त्यात पाणी साठवून ठेवतात. मे महिन्यात कमी पाणी येऊ लागल्याने त्यांच्या हालात भरच पडली आहे. अनेक इमारतींमध्ये दुपारी १२ ते एकदरम्यान पाणी येते.

रहिवाशांनी मोटार लावून ते आपल्या घरात खेचू नये म्हणून इमारतीची वीज बंद केली जाते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात रहिवाशांचे प्रचंड हाल होतात, अशी कैफियत समाजसेविका तर्जिना परब यांनी मांडली.

अवैध जोडण्यांचे संकट 
कांदिवली परिसरात लिंक रोडवरील झोपडपट्टीतील दुकानदारांनी म्हाडाच्या 
मुख्य जलवाहिनीतून अवैध जोडण्या घेतल्या आहेत. त्याचे पाणी आपल्या झोपड्या, हॉटेल आणि दुकानांना पुरवले जाते. त्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, की ते तात्पुरती कारवाई करतात; पण काही दिवसांनी ‘जैसे थे’ परिस्थिती उद्‌भवते. मध्यरात्री अवैध नळजोडण्या घेतल्या जात असल्याने पालिका अधिकारीही हतबल झाले आहेत.

विहिरी खुल्या कराव्यात
कांदिवली पूर्व आणि पश्‍चिम परिसरात किमान १०० विहिरी असून त्यातील काही बुजवण्यात आल्या आहेत. उरलेल्या विहिरी बंद करण्यात आल्या. स्वच्छ असलेल्या विहिरी खुल्या करून त्याचे पाणीटंचाईच्या काळात वापरावे, अशी सूचनाही केली जात आहे.

सध्या टंचाईमुळे पाणीकपात करावी लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा नियमित पाणी मिळेल.
- सागर लाड, पालिका जलअभियंता

चारकोप-गोराई परिसरात १० टक्के पाणीकपात आहे. मात्र, रहिवाशांना प्रत्यक्षात ५० टक्के कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये पाण्यावरून वाद होत आहेत. गेल्याच आठवड्यात बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. टंचाईबाबत आयुक्तांची भेट घेतली असून त्यांनी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. 
- शिवा शेट्टी, माजी नगरसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Electricity Cutting Water Tanker