चाळी अाणि टॉवरना टॅंकरचाच आधार

सचिन सावंत
सोमवार, 20 मे 2019

पाण्यासाठी तीन-चार तासांची रांग
दहिसरमधील राजेंद्र नगर, अभिनव नगर, देवीपाडा, दत्ता पाडा, रायडोंगरी आदी परिसरात तर पाण्यासाठी रांग लागत आहे. एक गॅलन पाणी मिळवण्यासाठी तीन-चार तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मुलांची सुट्टी असली तरी त्यांना खेळण्यावर पाणी सोडावे लागले आहे. त्यांना पाण्यासाठीच्या रांगेत उभे करून गृहिणी घराची कामे आटोपून घेत आहेत.  पालिकेच्या नळाला येणारे पाणी पिण्यासाठीही पुरत नाही, अशी कैफियतही अनेक रहिवाशांनी मांडली.

मुंबई - वर्षभरापासून सुरू असलेल्या पाणीकपातीने मे महिन्यात उग्र रूप धारण केले आहे. तलावातील पाणीपातळी घटल्याने कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे झोपड्या, चाळी आणि इमारतींनाही फटका बसत आहे. दहिसर, कांदिवली, मागठाणे, बोरिवली आदी भागांतील अनेक इमारतींमध्ये रोजच टॅंकरच्या पाण्यावर घर चालवावे लागत आहे. पाणीमाफियांकडून सुरू असलेल्या लुटीचा सामनाही रहिवाशांना करावा लागत आहे.

बोरिवलीतील ‘कंट्री पार्क’ इमारतीत रोज पिण्याव्यतिरिक्त पाण्यासाठी टॅंकर मागवावा लागत आहे. पाचसहा महिन्यांपासून अशीच परिस्थिती आहे. रोज पाण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. आठवड्यातून एकदा पिण्याच्या पाण्याचा टॅंकर मागवावा लागतो. त्यासाठी चार हजार रुपये मोजावे लागतात. कपात फक्त १० टक्के असल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात निम्म्यापेक्षा कमी पाणी येते, अशी तक्रार रहिवासी करतात. त्याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही दाद मिळत नाही, असे रहिवासी सुप्रिया दळवी यांनी सांगितले.

पालिकेने अनेक उंच भागांत इमारती बांधण्याची परवानगी दिली. पालिकेचे जलकुंभ जुन्या मुंबईची गरज ओळखून बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक उंच भागांत पाणी पोहचत नाही. त्यामुळे परिसरातील अनेक इमारतींमधील रहिवासी पाणीटंचाईने बेजार झाले आहेत. पिण्याच्या व्यतिरिक्त पाण्यासाठी टॅंकर मागवला असला, तरी तो दिवसभर पुरत नाही. त्यामुळे धुणी-भांडी आणि साफसफाई झाल्यानंतर एकदोन बादल्या पाण्यात दिवस काढावा लागतो. ज्या घरात लहान मुले किंवा आजारी व्यक्ती आहेत त्यांचा त्रास तर अधिकच वाढला असल्याचे दळवी यांनी सांगितले.

पाण्याने झोप उडवली
दहिसरमध्ये पश्‍चिम द्रुतगती मार्गाच्या बाजूला रात्रीच्या वेळी पाणी येते. कपातीमुळे पाण्याचा दाब कमी असल्याने पूर्वी एक गॅलन भरण्यासाठी पूर्वीपेक्षा दुप्पट वेळ लागत आहे. त्यामुळे रात्रभर जागून रहिवाशांना पाणी भरावे लागत आहे. अनेक वेळा तर पाणी भरण्यावरून भांडणेही होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यातही पाण्याला दाब नसल्याने ते एका पाईपने लहान भांड्यात भरावे लागते. त्यातून टोपातून ते गॅलनमध्ये भरावे लागते. अशी कसरत तीनचार गॅलन भरेपर्यंत करावी लागते. त्यातून हात दुखण्याच्या व्याधी अनेकांना जडल्या आहेत. अनेक घरांतील तरुणांना रात्रभर पाणी भरून दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जावे लागते, अशी कैफियत रमेश पाटील यांनी मांडली.

वन विभागाच्या हद्दीत तर दुष्काळच
दहिसरमध्ये मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या हद्दीत घरे आहेत. त्या भागात नवी जोडणी टाकायची झाल्यास वन विभागाची परवानगी लागते. त्यामुळे त्यात विलंब होतो. जुन्या जलवाहिन्या आहेत; पण लोकसंख्या वाढल्याने त्यातून येणारे पाणी अपुरे पडते. त्यातच आता कपात असल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Mumbai Chawl Building Water Tanker