ठाण्यात रस्त्यांवर पाणीच पाणी 

ठाणे: कामगार रुग्णालय मार्गावररील रस्त्यावर जलवाहिनी फुटून आलेले पाणी. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे: कामगार रुग्णालय मार्गावररील रस्त्यावर जलवाहिनी फुटून आलेले पाणी. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे : स्मार्ट शहराकडे झेपावणाऱ्या ठाणे शहराला लागलेले कोंडीचे ग्रहण सोडवण्यासाठी दीड वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या वागळे इस्टेट रस्ता क्र. 33 वरील ज्ञानेश्‍वर नगर ते कामगार रुग्णालय या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काहीअंशी पूर्ण झाले; मात्र कॉंक्रीटचा रस्ता उभारताना भूमिगत जलवाहिनी बाधित झाल्याने पाण्याच्या गळतीची संततधार सुरूच आहे. त्यामुळे या रस्त्यावर सदैव पाणीच पाणी वाहत असून यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, याच रस्त्यावर पुढे रामनगर येथेही रस्त्याखालील जलवाहिनी फुटून रस्ता जलमय झाल्याने पाण्याची नासाडी सुरूच आहे. 

ठाण्यातील नितीन कंपनी जंक्‍शन ते इंदिरानगरकडे जाणाऱ्या वागळे इस्टेट रस्ता क्र. 33 या दोन पदरी रस्त्यावर सकाळ-संध्याकाळी वाहनांची वर्दळ असते. किंबहुना, हा संपूर्ण परिसर कामगार वसाहतीचा असल्याने येथून पायी ये-जा करणाऱ्यांचीही गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. याच रस्त्यावर कामगार रुग्णालय ते ज्ञानेश्‍वर नगरपर्यंतच्या एका दिशेच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम जून 2018 ला ठाणे पालिकेमार्फत सुरू करण्यात आले. अत्यंत कूर्मगतीने पार पडलेल्या या रस्त्याचे बांधकाम सद्यस्थितीत पूर्णत्वाकडे गेले असले, तरी रस्त्याखालील जलवाहिनी बाधित झाल्याने या जलवाहिनीतील पाणी गेले अनेक महिने थेट रस्त्यावरच वाहत आहे. 

त्यामुळे येथून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना जिकिरीचे बनत आहे. त्याचबरोबर भरधाव वाहने हाकताना एखादा अपघात घडल्यास कोण जबाबदार, असा सवाल वाहनचालकांकडून केला जात आहे. दरम्यान, एकीकडे वागळे परिसराला पाणीटंचाईची समस्या भेडसावत असताना कॉंक्रीटच्या रस्त्याखाली झालेल्या या जलवाहिनी फुटीमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. तरीदेखील या समस्येकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. 

सत्ताधारी नगरसेवकांचे दुर्लक्ष 
वागळे इस्टेट भागातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या रामनगर परिसरातील डांबरी रस्त्याखालील जलवाहिनीदेखील अनेक महिने फुटली आहे. त्यामुळे सतत पाण्याची गळती सुरू असून रस्त्याच्या मधोमध पाण्याचे डबके बनले आहे. या भागात सत्ताधारी शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असूनही त्यांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तेव्हा महापालिका प्रशासनाने तरी सुरू असलेल्या या पाण्याच्या नासाडीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com