मुंबईकरांच्या पाणीवापरात कपात

water supply
water supply

मुंबई : या वर्षी चांगला पाऊस पडल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरले आहेत; परंतु मुंबईकरांच्या पाणीवापरावर लवकरच निर्बंध घातले जाणार आहेत. मुंबईला दररोज माणशी १३५ लिटर पाणी मिळते. त्याऐवजी माणशी ९० लिटर पाणी देण्याचे परिपत्रक महापालिका प्रशासनाने काढले आहे. 

मुंबईला सात तलावांमधून दिवसाला ३ हजार ७५० दशलक्ष लिटर आणि वर्षाला १४ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक मुंबईकराला दिवसाला १३५ लिटर पाणी दिले जाते. महापालिका प्रशासनाने आता माणशी ९० लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला असून गृहसंस्थांना पर्जन्यजल संधारण, कूपनलिका, सांडपाणी प्रक्रिया आदी मार्गांनी उर्वरित ४५ लिटर पाणी मिळवावे लागेल. याबाबतचे परिपत्रक प्रशासनाने जारी केल्याचे शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे समोर आणले आहे.

मुंबईतील जुन्या इमारतींना ही संकल्पना राबवणे शक्‍य नसल्याने प्रशासनाने संबंधित परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. उपनगरातील टेकड्यांच्या भागात कूपनलिका घेणे शक्‍य नाही. खाडीलगतच्या भागात २०० फुटांहून खोल विंधनविहीर घेतल्यास खारट पाणी येते. जुन्या इमारतींना जागेअभावी व निधीअभावी पर्जन्यजल संधारण प्रकल्प उभारणे शक्‍य नसल्याचे संजय घाडी, विद्यार्थी सिंग, राजुल पटेल, सभागृह नेत्या विशाखा राऊत आदींनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले.    

काय आहे परिपत्रकात?
विकास आराखडा २०१४ ते २०३४ नुसार नवीन बांधकामांना पर्जन्यजल संधारण बंधनकारक करण्यात आले आहे. २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आली आहे. नवीन इमारतींच्या ठिकाणी पर्जन्यजल संधारण, बोअरवेल, एसटीपी (घनकचरा प्रक्रिया संयंत्र) आदी व्यवस्था करावी. त्यातून माणशी ४५ लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.  

---

नवीन बांधकामांच्या ठिकाणी पर्जन्यजल संधारण, कूपनलिका, घनकचरा प्रक्रिया आदी सुविधा नसल्यास भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, असा या परिपत्रकाचा उद्देश आहे. हे परिपत्रक २० चौरस मीटर भूखंडांवर नव्याने बांधकाम होणाऱ्या इमारतींना लागू असेल.
- प्रवीण दराडे, 
अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com