पगार मिळेपर्यंत पाणी विकून पैसे घ्या !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

वॉटर व्हेंडिंग मशीनवरील कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराची सूचना 

मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून वॉटर व्हेंडिंग मशीनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. यावर वॉटर व्हेंडिंग मशीनच्या कंत्राटदारांनी पाणी विका आणि पैसे घेऊन जा, अशी मुभा कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे कर्मचारी दररोज हे पाणी विकून संसाराचा गाडा हाकत आहेत. 

इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टूरिझम कॉपोर्रेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकांवर ८३ वॉटर व्हेंडिंग मशीन बसविल्या आहेत. या मशीन चालविण्याकरिता खासगी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मशीनवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांना मासिक ११ हजार रुपये वेतन मिळते; मात्र मागील चार महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यावेळी कंत्राटदार कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलासा म्हणून दिवसाला जेवढे पाणी वॉटर व्हेंडिंग मशीनद्वारे विकले जाते, तेवढे पैसे स्वत:कडे ठेवण्याची मुभा दिली; मात्र काही रेल्वे स्थानकांवर दिवसाला केवळ २०० रुपयांची पाण्याची विक्री होते. त्यामुळे कंपनीने लवकरात लवकर थकीत वेतन द्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Vending Machines employee not get paid from last four month