कडाक्याच्या उन्हात वन्यप्राण्यांना पाणवठ्यांचा मोठा आधार...

शर्मिला वाळुंज
बुधवार, 6 मे 2020

येऊरमध्ये पुरेसा साठा,  लॉकडाऊनमध्येही नैसर्गिक झरे स्वच्छ ठेवण्यावर भर

ठाणे ः ऐन संचारबंदीत मानवी वस्तीत काही भागात पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असल्या, तरी येऊर क्षेत्रातील वन्यप्राण्यांना मात्र पाणवठे आधार ठरत आहेत. जंगलातील पाणवठे आणि नैसर्गिक झरे दर आठवड्याला स्वच्छ केले जात असल्याने कडाक्याच्या उन्हातही प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यामध्ये स्वच्छ व पुरेसा पाणीसाठा असून पावसाळ्यापर्यंत प्राण्यांना पाणी मिळेल. येऊर क्षेत्रात 26 पाणवठे असल्याने उष्णतेच्या झळा प्राण्यांना बसत असल्याच्या घटनेची कोणतीही नोंद अद्याप झाली नसल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

प्रशासनाला सुनावलं, क्वारंटाईन करण्याबद्दल मुंबई हायकोर्ट म्हणतंय...  

येऊरच्या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर असला, तरी या भागातील वाढत्या शहरीकरणामुळे प्राण्यांपुढे अनेक अडचणी निर्माण होतात. अन्न आणि पाण्याच्या शोधात बरेचदा वन्यप्राणी शहरात शिरकाव करतात. वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी मिळावे, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही वनविभागाने जीपीएस प्रणालीद्वारे पाणवठ्यांची माहिती घेत त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. येऊर क्षेत्रात विविध ठिकाणी नैसर्गिक पाणवठे आहेत. या भागात पाऊसही मुबलक होत असल्याने या पाणवठ्यांना सतत पाणी असते.

...नाहीतर येत्या काळात त्या खासगी डॉक्टर्सचे परवाने होणार रद्द !

अनेकदा झाडांचा पालापाचोळा, दगड यामुळे नैसर्गिक स्त्रोत अडवले जाऊन पाणीसाठा कमी होतो. त्यामुळे जीपीएस प्रणालीद्वारे येऊर परिक्षेत्रातील 26 पाणीसाठ्यांवर नजर ठेवली जाते. दर आठवड्याला या पाणवठ्यांची स्वच्छता केली जाते. त्यामुळे सध्या सर्व पाणवठे स्वच्छतेसह पाण्याने काठोकाठ भरलेले आहेत. लॉकडाऊनचा कालावधी असला, तरी वन्यप्राण्यांना त्याचा फटका बसू नये, यासाठी कर्मचारी सेवा देत आहेत. या पाणवठ्यांवर बिबट्या, चितळ, सांबर, भेकर, माकड, रानडुक्कर, मोर, उदमांजर असे प्राणी येत असल्याची नोंद वनविभागाकडे आहे. 

डेंजर प्रकार ! वडा पाव खा, कोरोना पळवा... मुंबईत काहीही होऊ शकतं !

येऊर क्षेत्रात सध्या 26 पाणवठे असून हे नैसर्गिक स्त्रोत आहेत. दर आठवड्याला या स्त्रोतांची स्वच्छता वनविभागाचे कर्मचारी करत असल्याने झरे खुले राहण्यास मदत होत आहे. कडक उन्हाळा असला, तरी पुरेसा पाणीसाठा जंगलातच वन्यप्राण्यांना मिळत आहे. उन्हाळ्यात प्राण्यांना बरेचदा उष्णतेचा त्रास होऊन ते मुर्छित होऊन पडतात. यंदा अजून, तरी अशी एकही घटना आढळलेली नाही. 
- राजेंद्र पवार,
वनपरिक्षेत्र अधिकारी

Watershed support for wildlife in Yeoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watershed support for wildlife in Yeoor