रेल्वेस्थानकांचा मार्ग सुकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

उल्हासनगर - चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या, फेरीवाल्यांवर धडक कारवाई करत उल्हासनगर महानगरपालिकेने मिशन क्‍लीन रेल्वेस्थानक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत उल्हासनगर, तसेच शहाड स्थानकाचा परिसर चकाचक करण्यात आल्याने प्रवासी सुखावले आहेत.

शहाड स्थानकाच्या परिसराला हातगाड्या, टपऱ्या, फळविक्रेते, सरबतविक्रेते, पान टपऱ्या, वडापाव, चहाविक्रेत्यांनी वेढा घातला होता. त्यामुळे सकाळी लोकल पकडण्यासाठी जाताना आणि लोकलमधून उतरून घरी जाताना प्रवाशांना कसरत करावी लागत असे. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, सहायक आयुक्त अलका पवार यांच्याकडे याबाबतच्या तक्रारी येताच, दोघांच्या उपस्थितीत मुकादम हरेश उदासी, महेंद्र कारेकर, कैलास थोरात, रणजित गायकवाड, मधू निरभवणे आदींनी शहाड रेल्वेस्थानकाच्या परिसरातील सर्व बेकायदा टपऱ्या, हातगाड्या उद्‌ध्वस्त करून परिसर मोकळा केला. उल्हासनगर रेल्वेस्थानकाच्या पूर्व व पश्‍चिम भागातही सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, दत्तात्रय जाधव, मुकादम पी. ओ. पाटील, श्‍याम सिंह, मयूर परब, रवी पाटील, हरेश धामनानी आदींनी कारवाई केली आहे. पूर्वेला रेल्वेस्थानकाच्या बाहेर शहीद मारोती जाधव रिक्षा युनियनचे कार्यालय होते. कार्यालयाच्या मागेच युनियनची भंगार झालेली रुग्णवाहिका होती. सहायक आयुक्त शिंपी यांनी युनियनचे अध्यक्ष तथा शिवसेना नगरसेवक शेखर यादव, सरचिटणीस दिगंबर हजारे यांना केलेल्या सूचनेनुसार यादव यांनी रुग्णवाहिका काढून कार्यालय मागे घेतल्यामुळे चाकरमान्यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 

Web Title: The way to the railway station