...तर हक्कभंग आणू : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

शिवसेनेचे खासदार 'इरडा'च्या अध्यक्षांना भेटून जाब विचारणार आहेत. यावेळी इरडाच्या अध्यक्षांनी जर टाळाटाळ केली तर शिवसेनेचे खासदार अध्यक्षांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणतील.

- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

मुंबई : इन्शुरन्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे 'इरडा'चे (इन्शुरन्स रेग्युलरीटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) असून, ते त्यांनी करावे. शिवसेनेचे खासदार 'इरडा'च्या अध्यक्षांना भेटून जाब विचारणार आहेत. यावेळी इरडाच्या अध्यक्षांनी जर टाळाटाळ केली तर शिवसेनेचे खासदार अध्यक्षांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणतील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याचे समजते. 

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पीक विमा आढावा बैठक घेतली. या बैठकीला मंत्री सुभाष देसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर आणि कृषी मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. गेल्या दीड महिन्यात शिवसेनेच्या आंदोलनामुळे साडेअकरा लाख शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये मिळवून देऊ शकलो. पीक विमा आंदोलन सकारात्मक पार पडले. ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा योजनेची रक्कम मिळाली नाही, अशा शेवटच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मांडली.

पीक विमाबाबत दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ज्या काही नियमांमुळे शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. त्यात बदल करण्याची मागणी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असून, त्यावर पंतप्रधानांनी सकारात्मक होकार ही कळवला आहे.

विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या इन्शुरन्स रेग्युलरीटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (इरडा) शिवसेनेने पीक विमा कंपन्यांबाबत पत्र पाठवले आहे. त्यानुसार इरडाचे अध्यक्ष दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांना भेटणार आहेत. जर ते भेटले नाहीत तर आमचे खासदार हक्कभंग आणतील. असा इशारा ही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. याबाबत मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन पीक विम्याबाबत आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we can call Violation against IRDC President says Uddhav Thackeray