लोकांचा रोजगार उद्धवस्त करणाऱ्या प्रकल्पांना आमचा पाठिंबा नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस समविचारी पक्षांसोबत राहील. पंतप्रधानपदाच्या इच्छेबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही.

डहाणू : देशात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे; मात्र धरण महामार्गाचे चौपदरीकरण, सहा पदरीकरण, बुलेट ट्रेन, कॉरिडोर, इंडस्ट्रियल झोनसाठी शेतीच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. पर्यायाने शेतीचे क्षेत्रच कमी होत आहे. त्यामुळे शेती उद्‌ध्वस्त न करता विकास प्रकल्प राबवा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी डहाणूत केले. 

डहाणू रिलायन्स सभागृहात स्थानिक उद्योजक, मच्छीमार, बागायतदार, उद्योजक, भूमिपुत्रांची बैठक शनिवारी झाली. या वेळी आमदार आनंद ठाकूर, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस प्रमोद हिंदुराव, डहाणू तालुका अध्यक्ष राजेश पारेख, वैभव संखे, मिहिर शहा, संजय पाटील, शमी पिरा, करण ठाकूर, शशी बारी, रमेश कर्नावट, रवींद्र फाटक, विनायक बारी, प्रा. राहुल भोईर, संजीव जोशी, ममता राऊत, वाढवण बंदर कृती संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते, त्या वेळी पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, की भारत विकसनशील देश आहे. देशातील विकासाची प्रक्रिया थांबता कामा नये. त्यामुळे विकास होऊ द्यायचा नाही, असे माझे मत नसून विकास झालाच पाहिजे; मात्र विकासाचा कार्यक्रम राबवताना सामान्य माणूस उद्‌ध्वस्त होता कामा नये. त्यामुळे पर्याय शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस समविचारी पक्षांसोबत राहील. पंतप्रधानपदाच्या इच्छेबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शक्‍यता कमीच आहे. त्यावरच पालघर लोकसभेचा निर्णय कायम राहील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

वाढवण बंदराची गरज का? 

वाढवण बंदराला लागूनच चिकूची लागवड आहे. घोलवडचा चिकू देशात प्रसिद्ध आहे. डहाणूत सागरी किनाऱ्यामुळे मच्छीमारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मच्छीमारांचा रोजगार उद्‌ध्वस्त होणार असेल, तर आमचा पाठिंबा नाही. पालघर जिल्ह्याच्या एका बाजूला मुंबई; तर दुसऱ्या बाजूला बडोदरा आहे. त्यामुळे वाढवण बंदरांविषयी पवार यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. सध्या इंडस्ट्रियल कॉरिडोर, मुंबई-बडोदा महामार्ग, बुलेट ट्रेन हे तीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. या तिन्हीही प्रकल्पांची खरोखरच गरज आहे का? या प्रकल्पातून एकच पर्याय निघेल का, याबाबतच्या सूचना केंद्र सरकारला सुचवणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

बुलेट ट्रेनवरही टीका 

राज्यकर्त्यांनी दूरदृष्टीने विचार करायला हवा, असे नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले होते. वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, औद्योगिक क्षेत्र, कॉरिडोर हे प्रकल्प लादून सरकार लोकांमध्ये विकासाचा पुरावा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली होती; मात्र बुलेट ट्रेनची खरोखरच आवश्‍यकता आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करीत पवार यांनी सरकारला लक्ष्य केले.
 

Web Title: We not support to Peoples Employment Disturb says Sharad Pawar