पश्‍चिम रेल्वेच्या लोकलमध्ये "टॉक बॅक' यंत्रणा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मुंबई - लोकल प्रवासामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी "टॉक बॅक' प्रणाली लावण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत महिला प्रवाशांना गार्डशी संपर्क साधता येणार आहे. मार्च 2017 पर्यंत दोन लोकल गाड्यांतील महिलांच्या सहा डब्यांमध्ये ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात येणार आहे.

मेट्रोच्या धर्तीवर लोकलमध्ये पहिल्यांदा हा प्रयोग होणार आहे. वर्सोवा-घाटकोपरदरम्यानच्या मेट्रोमध्ये प्रत्येक डब्यात टॉक बॅक ही यंत्रणा आहे. या प्रणालीअंतर्गत लोकलच्या प्रत्येक डब्याच्या दरवाज्याजवळ एक काळे बटण लावण्यात येते. हे बटण दाबल्यानंतर गार्डच्या केबिनमध्ये असलेल्या गार्डशी ध्वनिक्षेपकाद्वारे बोलता येऊ शकते. कोणत्या डब्यातील बटण दाबले गेले आहे, हे गार्डला त्याच्यासमोर असलेल्या स्क्रीनवरून सहज लक्षात येते. त्यामुळे गार्डही प्रवाशांशी संपर्क साधू शकतो. आणीबाणीच्या परिस्थितीत गार्डशी संपर्क साधल्यानंतर गार्ड प्रवाशांपर्यंत तातडीने मदत पोहोचवू शकतो. सध्या चाचणीच्या टप्प्यात असलेल्या एसी लोकलमध्येही टॉक बॅक प्रणाली अस्तित्वात आहे.

पहिल्या टप्प्यात पश्‍चिम रेल्वेवरील दोन लोकलमधील सहा महिला डब्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम पश्‍चिम रेल्वेच्या महालक्ष्मी कारशेडमध्ये सुरू आहे. त्या लोकल फेब्रुवारीपर्यंत तयार होतील. त्यानंतर मार्चमध्ये या लोकल सेवेत येणार आहेत. या प्रणालीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास इतर लोकलबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. याशिवाय पश्‍चिम रेल्वेने महिलांच्या डब्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी सात लोकलमधील प्रत्येकी तीन डब्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

Web Title: western railway local talk back system