हार्बरच्या विस्तारासाठी पश्‍चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई - हार्बर मार्गाच्या विस्ताराबाबत आवश्‍यक असलेली विविध कामे मार्गी लावण्यासाठी रविवारी (ता. 23) जोगेश्‍वरी स्थानकात विशेष 12 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. जोगेश्‍वरी स्थानकात बोरिवलीच्या दिशेने डाव्या बाजूचा फलाट क्रमांक एक हटवण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव स्थानकापर्यंत हार्बर मार्गाच्या विस्तारातील अडथळा दूर होणार आहे.

जोगेश्‍वरी स्थानकातील फलाट हटवण्याच्या कामासाठी शनिवारी रात्री 12 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जोगेश्‍वरी स्थानकाच्या बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल अंधेरी ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जातील. राम मंदिर स्थानकाला जलद मार्गाचा फलाट नसल्याने येथे या गाड्या थांबणार नाहीत, तर जोगेश्‍वरी स्थानकात फलाट क्रमांक तीनवर जलद गाड्या थांबणार आहेत. या दिवशी काही गाड्या रद्द करण्यात आल्याचे पश्‍चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी कळवले आहे.

Web Title: western railway megablock for harbour development