मुंबईत युती होणार की नाही ? 

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना-भाजपचा गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला कलगितुरा आता थांबण्याची चिन्हे असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात जुने दोस्त पुन्हा गळ्यातगळा घालण्याची दाट शक्‍यता आहे. उभय पक्षांच्या नेत्यांकडून युतीचे संकेत दिले जात असले दोघांनीही अद्याप पत्ते मात्र खुले केले नाहीत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना आणि शिवसेनेला जशासतसे उत्तर देणारा भाजप. हे चित्र राज्यातील जनतेला पाहण्यास मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. मात्र भाजपने सर्वाधिक बाजी मारून वर्चस्व निर्माण केले. नगरपालिका निवडणुकीतील यशानंतर भाजपचा विश्वास दुणावल्याने हा पक्ष मुंबईसह महापालिका निवडणुकीत युती करण्याची शक्‍यता मावळली होती. पण, गेल्या दोनतीन दिवसात मुंबईत झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एका व्यासपिठावर आले. या दोघांनीही युती करण्याबाबत भाष्य केले असले तरी पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. एकीकडे युतीचे संकेत दिले जात असताना दुसरीकडे भाजपने शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश गंभीर आणि सुनील गणाचार्य या दोन महत्त्वाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेला आणखी एक धक्का दिला. त्यामुळे अद्याप शिवसेनेला भाजप युती करेल की नाही याची शंका आहे. मात्र मुंबईत युती व्हावी अशी दोन्ही पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांची इच्छा आहे. परंतु तसे बोलण्याचे धाडस कोणी करीत नाही. 

गेल्या गुरूवारी भांडूप येथील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या समस्या एकत्रितपणे सोडवू, असे सांगत युती करण्यास आपण सकरात्मक असल्याचा संदेश दिला. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुंबईकरांचा युतीवर विश्‍वास असून त्यामुळेच आम्ही सलग वीस वर्षे सत्ता राबवू शकलो, असे म्हणत फडणविसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. तर फडणविसांनी यावेळी महापालिकेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून केंद्र सरकारकडून जे काही परवाने आणले जातील. त्यासाठी एका समन्वय समितीची स्थापना केली जाईल, असे सांगितले. 
त्यानंतर मुंबईत काल(शुक्रवारी) झालेल्या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी लिखीत पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातही या दोघांनी एकमेंकांवर स्तुतीसुमने उधळली. सध्याच्या या गोड वातावरणामुळे तिखटप्रिय शिवसैनिक व युतीफोड भाजपीय कार्यकर्ते मात्र गोंधळात सापडले आहेत. 

सरांच्या कोटीवर मौन 
युती टिकविण्यासाठीच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माझ्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणल्याची कोटी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली खरी. मात्र त्यांच्या या कोटीवर दोन्ही नेत्यांनी कोणचेही भाष्य न करता मौन पाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com