या माणसांना झालंय तरी काय? 

या माणसांना झालंय तरी काय? 

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात काही दिवसांपासून लैंगिक विकृतांनी उच्छाद मांडला आहे. रोज किमान एक तरी लैंगिक अत्याचाराची घटना उघड होते. या वासनांधांच्या तावडीतून दोन वर्षांच्या अजाण, निष्पाप, निरागस बालक-बालिकांपासून वृद्ध महिलाही सुटलेल्या नाहीत. अलीकडेच काही विकृतांनी धावत्या लोकलमध्ये महिला प्रवाशांसमोर हस्तमैथुन केल्याच्या घटनाही उघड झाल्या होत्या. लैंगिक भूक शमवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे कांदिवली आणि बोरिवलीतील दोन वेगवेगळ्या घटनांवरून दिसून आले. 

कांदिवलीत एका इमारतीच्या विकृत वॉचमनने लैंगिक समाधान मिळवण्यासाठी भटक्‍या कुत्रीच्या जननेंद्रियात काठी घातली. या घटनेत तो मुका जीव हकनाक मृत्युमुखी पडला; तर बोरिवलीतील घटनेत कामांध रिक्षाचालकाने भररस्त्यात रिक्षा थांबवून प्रवासी महिलेसमोर हस्तमैथुन केले. समाजमनाच्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडणाऱ्या अशा लिंगपिसाटांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान सुसंस्कृत समाज आणि सरकारसमोर आहे. 

कांदिवलीतील घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रेमाशंकर रॉय (40) या वॉचमनला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तो ठाकूर कॉम्प्लेक्‍समधील आशीर्वाद इमारतीत वॉचमन म्हणून काम करत असे. ती कुत्री माझ्यावर भुंकल्याने मी हे कृत्य केल्याचा बचाव त्याने केला असला तरी त्याच्या या हीन कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

16 ऑगस्टला रात्री कर्तव्यावर असताना रॉय याने हे बिंदू नावाच्या भटक्‍या कुत्रीसोबत हे हिणकस कृत्य केले. दुसऱ्या दिवशी कांदिवलीतील आशानगर परिसरात भटक्‍या कुत्र्यांचा सांभाळ करणाऱ्या निशा जैन यांना बिंदू रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिचे आतडेही बाहेर आले होते. जैन यांनी बिंदूला नजीकच्या डॉ. प्रेमल दर्जी यांच्या दवाखान्यात नेले. तेथे तिच्यावर दोन तास शस्त्रक्रिया झाली; मात्र दुपारी 3.30च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. 

परिसरातील इमारतींतील सीसी टीव्ही फुटेज मिळवल्यानंतर जैन यांनी मुंबई ऍनिमल असोसिएशन (मॉं)चे स्वयंसेवक व प्राणी हक्क कार्यकर्ता अभिषेक कपडोस्कर यांच्यासह समता नगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी 21 ऑगस्टला रॉयला अटक केली. रॉयचे कृत्य उघड झाल्यानंतर आशीर्वाद सोसायटीने त्याला कामावरून काढून टाकले आहे. 

बोरिवलीतील घटना संबंधित महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर उघड झाली. या महिलेने बुधवारी रात्री मालाडहून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. काही अंतर गेल्यावर चालक राजबहादूर पाल याने तिच्यासमोर अश्‍लील चाळे करण्यास सुरुवात केले. त्यानंतर रस्त्यातच वाहन थांबवून त्याने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घाबरलेल्या त्या महिलेने रिक्षातून उतरत पळ काढला. सोशल मीडियावर तिने केलेल्या पोस्टची दखल घेत बोरिवली पोलिसांनी तपास करत पाल याला अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

भा.दं. संहितेन्वये गुन्हा नोंदवा! 
कांदिवलीतील घटनेप्रकरणी संबंधित वॉचमनविरोधात भारतीय दंड विधानातील तरतुदीप्रमाणे गुन्हा नोंदवावा. हे प्रकरण दिल्लीतील "निर्भया' बलात्कार घटनेप्रमाणेच असून, वॉचमनवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी "पेटा' या प्राणिमित्र संघटनेने पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com