हिंसाचार रोखण्यासाठी व्हॉट्‌सॲपची मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

जमावाकडून हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्य पोलिस दलाने निर्माण केलेली ‘व्हॉट्‌सॲप यंत्रणा’ आता निवडणुकीच्या काळात अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी वापरली जाणार आहे.

मुंबई - जमावाकडून हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्य पोलिस दलाने निर्माण केलेली ‘व्हॉट्‌सॲप यंत्रणा’ आता निवडणुकीच्या काळात अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी वापरली जाणार आहे. अफवा रोखण्यासाठी राज्य पोलिस दलाने पोलिस पाटील व त्यांच्या पोलिसांना सहकार्य करणाऱ्यांसाठी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले होते.

हिंसाचाराच्या घटना होऊ शकतील असे आक्षेपार्ह संदेश, छायाचित्रे, मॉर्फ छायाचित्रे, चित्रफितींवर पोलिस पाटलांसह पोलिसांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अशा संदेशांमुळे स्थानिक पातळीवर हिंसाचार होण्याची शक्‍यता वाटत असल्यास त्यांची माहिती अधीक्षक कार्यालय, महासंचालक कार्यालयाच्या संपर्कात असलेल्या नोडल अधिकाऱ्याला देण्यास सांगण्यात आली आहे.  निवडणुकांच्या काळात राजकीय नेत्यांचे मॉर्फ केलेले छायाचित्र किंवा चित्रफितींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू शकतो. तसेच समाजकंटकांकडून धार्मिक व जातीय भावना दुखावण्यासाठीही असे संदेश पाठवले जाण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे असे संदेश, छायाचित्रे व चित्रफिती लवकरात लवकर समाजमाध्यमांवरून काढून टाकण्यासाठी अशा व्हॉट्‌सॲप ग्रुपची मदत होणार आहे. राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबातील किमान सदस्य या ग्रुपमध्ये असेल, याची काळजी पोलिस पाटलांकडून घेण्यात येत आहे. तसेच या ग्रुपचे प्रमुख हे पोलिस पाटील, सरपंच असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. २०१८ मध्ये मुले चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची छायाचित्रे, चित्रफिती समाजमाध्यमांवर पसरवण्यात आल्याने नऊ जणांवर सामूहिक अत्याचार, दगडफेक करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अशा अफवा रोखण्यासाठी व्हॉट्‌सॲप ग्रुप स्थापन करण्यात आले आहेत.

राज्यात ११०० पोलिस ठाणी आहेत. त्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान एक व जास्तीत जास्त सात व्हॉट्‌सॲप ग्रुप कार्यरत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांमध्ये व्हॉट्‌सॲप ग्रुपची संख्या अधिक आहे. अशा ग्रुपचा नक्‍कीच फायदा होणार आहे. 
- मिलिंद भारंबे, निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था

Web Title: Whatsapp help to prevent violence Election Period