व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश कधी? अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; माहिती देण्याची मागणी

व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश कधी? अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; माहिती देण्याची मागणी



मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अद्याप व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाबाबत महाविद्यालयांकडून माहिती न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

अकरावीच्या ऑलनाईन प्रवेश प्रक्रियेस गेल्या चार दिवसांपासून सुरूवात झाली आहे. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयांनी अद्यापही व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाच्या जागा आणि त्यासाठीचे नेमके वेळापत्रक जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप 'सिस्कॉम' संस्थेच्या संचालक व शिक्षण प्रमुख वैशाली बाफना यांनी केला. त्याचबरोबर अकरावी प्रवेशासाठी अनेक महाविद्यालये शुल्क आकारतात. परंतु, त्याची नेमकी माहिती विद्यार्थी, पालकांना नसते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेदरमयान प्रत्येक महाविद्यालयांकडील प्रयोगशाळा, स्वच्छतागृह, खेळाचे मैदान, वाचनालय, एनसीसीसारखे उपक्रम, विभागाशी संलग्न असणारे कोर्स आदींबाबत विद्यार्थी, पालकांना माहिती मिळावी यासाठी या महाविद्यालयाचे संकेतस्थळ प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळाला जोडून द्यावे, अशी मागणीही बाफना यांनी केली. 

गेल्या काही वर्षांत अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या लेखापरिक्षणात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी स्वतंत्र संस्थेमार्फत प्रवेश प्रक्रियेचे लेखापरीक्षण केले जावे, अशी मागणीही बाफना यांनी केली.

राज्यभरात एकच प्रक्रिया राबवावी
शालेय शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरात एकच शासन निर्णय पारित करावा आणि प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी संस्थेची निवड करण्याऐवजी शासकीय आदेशानुसार परिपूर्ण सॉफ्टवेअर तयार करावे. त्याच सॉफ्टवेअरमधून राज्यात  प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही 'सिस्कॉम' संस्थेच्या संचालक वैशाली बाफना यांनी केली.

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com