रांगांचे शुक्‍लकाष्ट संपेना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

ठाणे/कळवा - पाचशे व हजाराच्या नोटा बंद होऊन दहा दिवस उलटले तरी अजूनही सर्वसामान्यांच्या मागे लागलेले रांगांचे शुक्‍लकाष्ट संपण्याची चिन्हे नाहीत. स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना अजूनही खस्ता खाव्या लागत आहेत. एरवी सोशल मीडियावर या निर्णयाचे कौतुक करणारे रांगेत आल्यावर मात्र त्रस्त होत आहेत. काळा पैसा बाहेर काढायचाच होता तर हा एकमेव मार्ग हातात होता का, असा सवालही नागरिक करत आहेत. एवढे करूनही काळा पैसा नक्की कसा बाहेर येईल आणि भ्रष्टाचाराला कसा आळा बसेल, हे सरकारने जाहीर न केल्याची खंत अनेक जण व्यक्त करत आहेत.

नोटाबंदीचा निर्णय गेल्या आठवड्यात मंगळवारी (ता. 8) रात्री उशिरा जाहीर झाल्यानंतर देशात अभूतपूर्व गोंधळाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी बॅंका बंद असल्यामुळे कोणतेही व्यवहार झाले नाहीत. त्यानंतर गुरुवारी बॅंका उघडल्या तेव्हापासून नागरिकांनी रांगा लावल्या. त्या अद्याप संपलेल्या नाहीत. आपल्याजवळची साठवलेली पुंजी बॅंकेत जावून जमा करण्यासाठी प्रत्येक जण जीवाच्या आकांताने बॅंकांकडे धाव घेत आहे. बॅंकांच्याबाहेर असलेली एटीएम केंद्रेही अद्याप सुरळीत झालेली नसल्याने खात्यात पैसे असूनही काढता येत नसल्याने अनेकांचे व्यवहार थंडावले आहेत. दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे पैसे हातात यावेत म्हणून प्रत्येक सर्वसामान्य रांगांमध्ये तासन्‌तास उभा राहत आहे. मग यामध्ये जसे तरुण आहेत तसेच ज्येष्ठही आहेत. या रांगांमुळे अनेक ज्येष्ठांवर मानसिक ताण आला आहे. काहींना जीवही गमवावा लागला आहे. रांगांमध्ये उभे राहणारे सर्वसामान्य आहेत. मग ज्यांच्याकडे काळा पैसा आहे ते गेले कुठे, अशी चर्चा होत आहे. नोटाबंदीबाबत रोज नवीन निर्णय घेतले जात आहेत. पैसे काढण्याची मर्यादा कधी चार हजार, तर कधी अडीच हजार असल्याचे जाहीर केले जात असल्याने नेमके किती पैसे काढता येतील, याबाबत संदिग्धता आहे. आपलेच पैसे काढण्यावर आणलेल्या मर्यादेमुळे अनेक जण नाराज आहेत. ज्यांचे रोजंदारीवर पोट आहे ते यामध्ये भरडले जात आहेत. 

बॅंकांमधून दोन हजार रुपयांची नवीन नोट दिली जात असल्यामुळे बाजारात सुट्या पैशांची चणचण निर्माण झाली आहे. यामुळे उधारीवर व्यवहार सुरू आहेत. असे व्यवहार तरी किती काळ करायचे? दूध, भाजीपाला आणायचा कसा, असा प्रश्‍न गृहिणींना पडला आहे. बाजारपेठांतील आर्थिक व्यवहार मंदावले आहेत. त्यामुळे हेच का "अच्छे दिन' असा सवाल उपस्थित होत आहे. घरात लग्नकार्य किंवा दुःखद घटना घडली तर पैसे आणायचे कुठून, या रांगा कधी संपणार, असे प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात घोंगावत आहेत.

Web Title: when infront of bank queues ends