मुंबईचा महापौर कोण? आज अर्ज भरणार!

file photo
file photo

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उद्या (ता. 18) उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून शिवसेनेचे यशवंत जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. कॉंग्रेसही महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याची शक्‍यता आहे. राज्यातील सत्ता समीकरण बदलले, की लगेच मुंबई महापालिकेत फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. युती तुटली किंवा महाशिवआघाडी झाली, तरी शिवसेनेचे संख्याबळ भाजपच्या तुलनेत अधिक असल्याने शिवसेनेचाच महापौर होईल. 

युती तुटल्यास विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडून भाजपकडे जाईल आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला महापालिकेतील सत्तेत वाटा मिळू शकेल. 13 नगरसेवकांची पळवापळवी करून महापौरपद मिळवणे सध्या तरी भाजपसाठी सोपे नाही. महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी सोमवारी अर्ज भरले जाणार आहेत. शिवसेना उपमहापौर पदासाठीही अर्ज भरणार असल्याचे समजते. राज्यातील सत्तेच्या समीकरणावर मुंबई महापालिकेतील फेरबदल अवलंबून आहेत. सध्या तरी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडण्याची दाट शक्‍यता आहे. 

विद्यमान महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचा कार्यकाळ 21 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे 22 नोव्हेंबरला महापौरपदासाठी निवडणूक होईल. महापौर पदासाठी शिवसेनेचे मंगेश सातमकर, आशीष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, राजूल पटेल आणि यशवंत जाधव यांच्या नावांची काही दिवसांपासून चर्चा आहे. अनेक ज्येष्ठ नगरसेवक इच्छुक असले, तरी यशवंत जाधव यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते. राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाशिवआघाडीची सत्ता आल्यास मुंबई महापालिकेतील संख्याबळानुसार कॉंग्रेसला उपमहापौरपद मिळू शकेल. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या महिला नगरसेविकेला संधी मिळेल, अशीही चर्चा सुरू आहे. 

राज्यातील सत्तास्थापनेत कॉंग्रेसने शिवसेनेला साथ दिली, तर उपमहापौरपद कॉंग्रेसच्या नगरसेवकाला मिळणार असल्याचे बोलले जाते. कॉंग्रेसचे अनुभवी नगरसेवक अश्रफ आझमी, आसिफ झकारिया यांच्यापैकी एकाला हे पद देण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार असल्याचेही समजते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सुधार, विधी, आरोग्य आणि काही प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे जाण्याची शक्‍यता आहे; मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात उद्याच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याचे समजते. 

----- 

जाधव, राऊत यांच्यात चुरस 
मुंबई महापालिकेत 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद विद्यमान सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना मिळण्याची शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांची समजूत काढून स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यामुळे विशाखा राऊत आणि श्रद्धा जाधव यांच्यात या पदासाठी चुरस आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com