घरखर्चाला पैसे देत नसल्यामुळे पतीला जाळले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

घरखर्चाला पैसे देत नाही म्हणून पतीला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या 52 वर्षीय पत्नीला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली.

मुंबई, ता. 10 ः घरखर्चाला पैसे देत नाही म्हणून पतीला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या 52 वर्षीय पत्नीला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती गंभीररीत्या जखमी असून त्याच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सरिता लक्ष्मण मोरे असे अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव असून तिने पती गुरुदत्त शिवाजी देवगुडे(वय 55) याला जाळण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (ता.8) बीएनसी ट्रान्झिट कॅम्प येथे हा प्रकार घडला. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, एक व्यक्ती तेथे जळालेल्या अवस्थेत पडलेली होती. शेजारीच सरिताला काही लोकांनी पकडून ठेवले होते आणि तिनेच या व्यक्तीला जाळल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने गुरुदत्त देवगुडेला लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. देवगुडे हे भायखळा येथील रहिवासी असून त्यांचे सरितासोबत अनैतिक संबंध होते. त्यानंतर दोघांनीही नोंदणी विवाह (कोर्ट मॅरेज) केला होता. सरिता ही देवगुडेची दुसरी पत्नी आहे. ती 20 वर्षांपासून पत्नी म्हणून देवगुडेसोबत राहते; मात्र गेल्या काही वर्षांपासून देवगुडेने सरिताला घरखर्चासाठी पैसे देणे बंद केले. तसेच सरिताच्या घरी जाणे-येणेही बंद केले. त्यामुळे संतापलेल्या सरिताने देवगुडेच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली. 

याप्रकरणी पोलिसांनी दोन साक्षीदारांचा जबाब नोंदवला असून त्यांनी आरोपी पत्नीला पतीला जाळताना पाहिल्याचे सांगितले आहे. तसेच याप्रकरणी वापरण्यात आलेला रॉकेलचा डबा व आगपेटीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत असून पतीची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wifes burns husband because of money