आता लोकलमध्येही मिळणार 'वायफाय'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

मध्य रेल्वेच्या सर्व लोकलमधील डब्यांत प्रवाशांना मोफत वायफायची सुविधा मिळणार आहे.

मुंबई - मध्य रेल्वेच्या सर्व लोकलमधील डब्यांत प्रवाशांना मोफत वायफायची सुविधा मिळणार आहे. मध्य रेल्वेवरील सर्व लोकलच्या डब्यांत प्रवांशाच्या मनोरंजनासाठी हॉटस्पॉट बॉक्‍स बसवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. यासाठी रेल्वेने निविदा काढून एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. 

मध्य रेल्वेवरील एकूण १३१ लोकलच्या दररोज १ हजार ७३२ फेऱ्या होतात. या १३१ लोकलच्या फेऱ्यांतून दररोज ४२ लाख नागरिक प्रवास करतात. लोकलमधील अनेक प्रवासी मोबाईलमध्ये डोके घालून बसलेले दिसतात. अनेकदा हे प्रवासी डाऊनलोड केलेले चित्रपट पाहत असतात. या प्रवाशांना आता धावत्या लोकलमध्ये लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून चित्रपट, गाणी, बातम्या, मालिका, क्रिकेटचे सामनेही पाहता येतील.

रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी ‘न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडियाज स्कीम’ अंतर्गत उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यांत लोकलच्या डब्यांत हॉटस्पॉट बॉक्‍स बसवण्याचा समावेश आहे.  त्यासाठी मध्य रेल्वेने एका खासगी कंपनीला कंत्राट दिले असून, १२० दिवसांची मुदत दिली आहे. या कंपनीकडून मध्य रेल्वेला वर्षाला एक कोटी ५० लाख रुपये मिळणार आहेत.

भारतातील पहिलाच प्रयोग
धावत्या रेल्वेगाडीत हॉटस्पॉट बॉक्‍सची सुविधा देण्याचा भारतीय रेल्वेतील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात आले. या कामाला सुरुवात झाली असून, मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये तांत्रिक चाचण्या सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WiFi will be available in local

टॅग्स