ग्रामस्थांच्या प्रश्‍नांसाठी आंदोलनही करेन!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

गावठाण विस्तार सर्वेक्षण आणि मालमत्ता कार्डचा प्रश्‍न ८० टक्के सुटला आहे, पुढील काळात हा प्रश्‍न पूर्णपणे निकाली काढला जाईल. त्याकरिता प्रशासनाविरोधात आंदोलन करावे लागले तरी मागेपुढे पाहणार नाही, असा निर्धार नवनिर्वाचित आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला. 

नवी मुंबई : गावठाण विस्तार सर्वेक्षण आणि मालमत्ता कार्डचा प्रश्‍न ८० टक्के सुटला आहे, पुढील काळात हा प्रश्‍न पूर्णपणे निकाली काढला जाईल. त्याकरिता प्रशासनाविरोधात आंदोलन करावे लागले तरी मागेपुढे पाहणार नाही, असा निर्धार नवनिर्वाचित आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला. 

बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर म्हात्रे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मतदारांचे आभार मानत, पुढील पाच वर्षांच्या कामांची रूपरेषा स्पष्ट केली. शहरातील महिला, अाबालवृद्ध, शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणी यांच्या सुरक्षिततेसाठी उद्याने, बाजारपेठा, रस्ते, महाविद्यालये आदी भागांत सीसी टीव्ही यंत्रणा बसवण्यात येईल, असे आश्‍वासन म्हात्रे यांनी बोलताना दिले.  

विरोधात काम करून मला हरवण्याची चोख कामगिरी विरोधकांनी केली; त्याबाबत काही वाटले नाही. मात्र, एकाच पक्षात राहूनही काही समर्थकांनी व उपऱ्या शिवसैनिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याची खंत म्हात्रे यांनी या वेळी व्यक्त केली. ज्या शिवसैनिकांनी युतीधर्म पाळला नाही, त्यांच्या कार्याचा अहवाल वरिष्ठांपर्यंत पोहोचला असेल; परंतु कोणाविरोधात तक्रार नाही, असे म्हात्रे यांनी सांगितले. शहरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याप्रमाणे फुलपाखरू उद्यान उभारून शहराचे रुपडे पालटण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादनही  त्यांनी या वेळी केले. तसेच उमेदवारीची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे त्यांनी आभार मानले.

एकाही प्रकल्पग्रस्ताचा प्रश्‍न प्रलंबित राहणार नाही. गावठाण विस्तार असो, शहराचा सर्व्हे असो अथवा मालमत्ता कार्डचे वाटप असो; हे सर्व प्रश्‍न काही महिन्यांतच सोडवले जातील. 
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will also agitate for questions of villagers!