रायगडमध्ये नुकसानीचे पंचनामे रखडणार ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मुंबई : मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हजारो एकर भातशेतीचे नुकसान झाले असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायकांमार्फत करण्यात येत आहेत; परंतु सरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने सुरू असून, समन्वयाच्या अभावामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम रखडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.  

मुंबई : मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हजारो एकर भातशेतीचे नुकसान झाले असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायकांमार्फत करण्यात येत आहेत; परंतु सरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने सुरू असून, समन्वयाच्या अभावामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम रखडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.  

रायगड जिल्ह्यात मागील १५ दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अलिबाग, महाड, पोलादपूर, माणगाव, पेण या तालुक्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली. भाताची रोपे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. समुद्राच्या उधाणामुळे खारेपाटातील शेती नापीक झाली. आंब्याची अनेक झाडे उन्मळून कोसळल्याने मोठे नुकसान झाले. वादळी पावसात घरे, गोठ्यांची पडझड झाली. जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तालुका यंत्रणेला दिले. 

तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना संयुक्तपणे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र समन्वयाअभावी या कामात दिरंगाई होत असल्याचे बोलले जात आहे. ग्रामसेवक व महसूल कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’, लाक्षणिक उपोषण, मोर्चे अशी आंदोलने करत आहेत. त्यामुळे तलाठी व ग्रामसेवक कार्यालयांत नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर बाधितांना नुकसानभरपाई मिळण्यास दिरंगाई होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याबाबत मंत्रालय स्तरावरही पाठपुरावा केला जाईल, असे जिल्‍हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्‍हात्रे यांनी सांगितले.

सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा व आंदोलनामुळे नुकसानीचे पंचनामे रखडणार नाहीत. बाधितांना वेळेवर भरपाई मिळेल. आतापर्यंत १५४० पंचनामे तयार असून, शेतीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
- सचिन शेजाळ, तहसीलदार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will the loss of panchayats be kept in Raigad?