मुरूडला मिळवून देणार आंतरराष्ट्रीय पर्यटन दर्जा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

मुरूड - निसर्गरम्य, सुंदर किनारा लाभलेल्या मुरूड या पर्यटननगरीत देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावत असूनही याला पर्यटन दर्जा मिळालेला नाही. तो मिळवून देण्यासाठी; तसेच मूलभूत सोई-सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय अवजड व उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे दिली.

मुरूड-जंजिरा पर्यटन महोत्सव 2016 अंतर्गत मुरूड समुद्रकिनारी पर्यटकांसाठी उभारल्या जाणाऱ्या 32 लाखांच्या अद्ययावत "चेजिंग रूम'च्या भूमिपूजन सोहळ्याच्या अनावरणप्रसंगी अनंत गीते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश देसाई, ज्येष्ठ नेते महेंद्र दळवी, जिल्हा संपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संदीप घरत, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपनगराध्यक्षा नौशीन कबले, निलेश घाटवळ, कार्याध्यक्ष महेश भगत, प्रमोद भायदे, मुख्याधिकारी दयानंद गोरे आदी उपस्थित होते.

मागील वर्षी समुद्रकिनाऱ्यावरील दुर्दैवी घटनेत काही विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. अशी दुर्घटना भविष्यात घडू नये, याची नगरपरिषदेने सावधगिरी बाळगावी, असा सल्ला गीते यांनी या वेळी दिला. पर्यटकांची गैरसोय दूर व्हावी, म्हणून "सीमलेस कंपनी' नागोठणे यांच्या सहकार्याने चेजिंग रूमचे लवकरच लोकार्पण केले जाईल, असे सांगून त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिवकुमार यांना धन्यवाद दिले. येथील जनतेने नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेला एक हाती सत्ता दिल्याबद्दल जाहीर आभार मानत मुरूडच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारी निधी मिळवून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
मुख्याधिकारी गोरे यांनी आभार मानले.

Web Title: Will make Murud as a international heritage