बोनसरी नाल्याच्या संरक्षण भिंतींचे काम लांबणार

बोनसरी नाल्याच्या संरक्षण भिंतींचे काम लांबणार
बोनसरी नाल्याच्या संरक्षण भिंतींचे काम लांबणार

नवी मुंबई ः जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जलप्रलयाचा सर्वाधिक फटका तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावाला बसला. या नाल्याचे पाणी वस्तीतील रहिवाशांच्या घरात शिरल्याने अनेकांचे संसार वाहून गेले; मात्र त्यानंतर घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मनपा आयुक्त डॉ. एन. रामस्वामी यांनी या ठिकाणी पाहणी दौरा केला होता. या वेळी आयुक्तांनी हा नाला ओव्हरफ्लो होण्यास कारणीभूत असलेल्या दगडखाण मालकांवर गुन्हा नोंदविण्याचे व या ठिकाणी तत्काळ सुरक्षा भिंत उभारण्याचे; तसेच नाल्याची खोली वाढविण्याचे आदेश दिले होते. मात्र महिना उलटूनही या ठिकाणी अद्याप कोणतीच तत्परता प्रशासनाकडून दाखवण्यात आलेली नाही. आजही त्या ठिकाणी परिस्थिती जैसे थेच असल्याचे निदर्शनास येत आहे. 

बोनसरी नाल्यात पाणी भरून नागरिकांचे नुकसान झाल्याचे व शहरात पाणी भरल्याचे पडसाद स्थायी समितीतदेखील उमटले होते. त्यावर उत्तर देताना अतिरिक्त महावीर पेंढारी यांनी नाल्यांच्या दुरुस्तीकरिता १०/१० लाखांची कामे तत्काळ काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच ही कामे दोन दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यावर अजूनही अंमलबजावणी न झाल्याने बोनसरी गावातील रहिवाशांना पावसाळ्यात आपला जीव मुठीत धरूनच राहावे लागत आहे. 

बोनसरी गाव नाल्यालगत सुरक्षा भिंत उभारण्याच्या कामाचा अंदाजित खर्च निश्‍चित झाला असून, त्यावरील काही प्रक्रिया बाकी आहे. त्यानंतर हा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर निविदा काढल्या जातील, मग काम सुरू होईल.
- मनोज पाटील, कार्यकारी अभियंता, तुर्भे विभाग कार्यालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com