दारू, पैशांच्या वाहतुकीवर नजर - सहारिया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या धामधुमीतील गैरप्रकार रोखण्यासाठी मुंबईतील जल, हवाई, रस्ते, रेल्वे वाहतूक आणि बॅंक खात्यांवरील व्यवहारांवरही करडी नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शनिवारी दिली.

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या धामधुमीतील गैरप्रकार रोखण्यासाठी मुंबईतील जल, हवाई, रस्ते, रेल्वे वाहतूक आणि बॅंक खात्यांवरील व्यवहारांवरही करडी नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शनिवारी दिली.

मद्याची वाहतूक आणि पैशांच्या व्यवहारावरही आयोगाचे लक्ष असेल. सागरीमार्गे होणारी चोरटी वाहतूक रोखण्यासाठी तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या मदतीने खाडी किनारे सील करण्यात येतील, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले. सहारिया यांनी शनिवारी महापालिकेच्या निवडणूक कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत प्राप्तिकर, अबकारी अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवणार आहे.'

नागपूर येथे काही दिवसांपूर्वी परराज्यांतून रेल्वेने आलेला दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे मुंबईत असे प्रकार होऊ नयेत म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना रेल्वेला करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांची वाहतूक हवाईमार्गे करण्यात आली होती. त्यामुळे अनियंत्रित हवाई वाहतुकीवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. मुंबईत जलमार्गाने दारूची आणि पैशांची चोरटी वाहतूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांना सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सहारिया यांनी सांगितले.

बॅंक व्यवहारांवर नजर
नोटाबंदीनंतर सर्व पैसा बॅंकेत जमा झाला आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना वाटण्यासाठी हा पैसा बॅंकांमधून काढला जाऊ शकतो. त्यामुळे शहरातील सर्व बॅंकांच्या खात्यांच्या व्यवहारावर निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभागाचीही मदत घेण्यात आली आहे. उमेदवार मतदारांना वस्तूंचे वाटप करण्याची शक्‍यता असल्याने अशा कृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दहा विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे सहारिया यांनी स्पष्ट केले.

Web Title: wine, money transport watch