केबल ग्राहकांना नव्या दरांचे चटके 

केबल ग्राहकांना नव्या दरांचे चटके 

मुंबई - नव्या दररचनेमुळे केबल शुल्क कमी होईल, असे "ट्राय'ने (दूरसंपर्क नियामक प्राधिकरण) ग्राहकांना सांगितले होते; परंतु एक-दोन महिन्यांतच ग्राहकांना वाढीव दरांचे चटके बसू लागले आहेत. मर्यादित वाहिन्यांचे मासिक शुल्क 250 रुपयांवरून 500 ते 550 रुपयांवर गेल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. 

पूर्वी केबल ग्राहकांना नको असलेल्या वाहिन्या घ्याव्या लागत असत. नव्या रचनेत ग्राहकांना हव्या त्याच वाहिन्या निवडता येतील; त्यामुळे शुल्कही कमी होईल, असा दावा नवीन दरप्रणाली आणण्यापूर्वी "ट्राय'ने केला होता. आता नव्या रचनेत नि:शुल्क (फ्री टू एअर) वाहिन्यांचे अनिवार्य पॅकेज, वस्तू व सेवा कर, केबलचालकांची "नेटवर्क कपॅसिटी फी' आणि स्वतंत्र वाहिन्यांचे वाढलेले दर यामुळे केबल शुल्कात चांगलीच वाढ झाली आहे. नव्या दररचनेमुळे सरकारने नागरिकांचा आनंद हिरावून घेतला आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे सरचिटणीस तुषार आफळे यांनी केली. 

मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतील रहिवाशांनी आपले अनुभव "सकाळ'ला सांगितले. विक्रोळीतील सूर्यनगरमधील जनार्दन चव्हाण यांना पूर्वी सर्व वाहिन्या 300 रुपयांत पाहता येत असत. आता त्यांना 164 वाहिन्यांसाठी 400 रुपये द्यावे लागतात. शिवाजी पार्क येथील सुनील पाटील यांचे सर्व वाहिन्यांचे वार्षिक पॅकेज 4000 रुपये होते. आता त्यांना मर्यादित वाहिन्यांसाठी 5225 रुपये मोजावे लागतात. त्यातही ऍनिमल प्लॅनेटसारख्या वाहिन्या आता पाहता येत नाहीत, असे ते म्हणाले. विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्येही केबलचालकांनी वाहिन्यांची संख्या कमी करून शुल्कात 100 रुपयांनी वाढ केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भांडूप पश्‍चिमेकडील शिवाजी तलाव परिसरात इन केबल कंपनीकडून 325 रुपयांत सर्व वाहिन्या दाखवल्या जात होत्या. आता झी फॅमिली पॅक, सब आणि दोन क्रीडा वाहिन्या यांच्यासाठी 432 रुपये शुल्क द्यावे लागते, असे प्रसाद तांबे यांनी सांगितले. त्यात फक्त बातम्या पाहायला मिळतात. इंग्रजी वाहिन्या, स्टार मूव्ही, सोनी आदी वाहिन्या दिसत नाहीत; त्यामुळे अन्य पर्याय निवडणार आहोत, असे त्यांनी सांगितले. मालाड पूर्व परिसरात केबलसाठी 300 रुपयांऐवजी 480 रुपये द्यावे लागतात, अशी माहिती अर्चना कदम यांनी दिली. भांडुप पूर्वेकडे राहणाऱ्या लता पाटील यांना केबल शुल्कात 280 रुपयांवरून 380 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी नि:शुल्क वाहिन्यांसह तीन क्रीडा वाहिन्या, झी मराठी व झी युवा एवढ्याच वाहिन्या घेतल्या. त्यामुळे त्यांना फक्त 190 रुपये द्यावे लागतात. 

"नेटवर्क कपॅसिटी फी'चा बोजा 
"ट्राय'ने 100 नि:शुल्क वाहिन्यांनंतर प्रत्येक 25 वाहिन्यांसाठी ग्राहकाकडून 20 रुपये "नेटवर्क कपॅसिटी फी' घेण्याची परवानगी केबलचालकांना दिली आहे. एखादी अतिरिक्त वाहिनी घेतली, तरी हे शुल्क लागू होते. या दरामुळे शुल्कात मोठी वाढ होते. हे शुल्क घ्यायचे की नाही, किती घ्यायचे हा निर्णय केबलचालकांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी केबलचालक मनमानी पद्धतीने हे शुल्क आकारत असल्याने ग्राहक भरडले जात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com