पतीच्या हत्येनंतर महिलेचा प्रियकरासह आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून प्रियकरासह मुंबईत पळून आलेल्या महिलेने प्रियकरासह विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पनवेलमधील समीर लॉजिंग ॲण्ड बोर्डिंगमध्ये ही घटना घडली.

पनवेल : प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून प्रियकरासह मुंबईत पळून आलेल्या महिलेने प्रियकरासह विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पनवेलमधील समीर लॉजिंग ॲण्ड बोर्डिंगमध्ये ही घटना घडली. या घटनेत महिलेने आपल्या दोन वर्षीय मुलीलाही विष पाजल्याने तिचा मृत्यू झाला आहे. महिला आणि तिचा प्रियकर अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.    

या घटनेतील लिजी कुरियन (२९) व तिचा प्रियकर वसीम कादीर (३५) हे दोघे केरळ राज्यातील आहेत. दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र लिजीचा पती रिजोश हा त्यांच्या संबंधात अडथळा ठरू लागल्याने लिजी आणि वसीम या दोघांनी ३१ ऑक्‍टोबर रोजी रिजोशची हत्या करून पळ काढला होता. त्यानंतर लिजीचा पोलिस तपास करत होते. लिजी ५ नोव्हेंबर रोजी आपल्या मुलीला घेऊन प्रियकर वसीम याच्यासह मुंबईत पळून आली होती. 
शनिवारी सकाळी पनवेलच्या मार्केट यार्डमधील समीर लॉजिंग ॲण्ड बोर्डिंगमध्ये ते थांबले होते. यावेळी लिजी व वसीम या दोघांनी भीतीपोटी स्वतः विष पिऊन दोन वर्षीय मुलीलाही विष पाजले. दोघे दरवाजा उघडत नसल्याचे आढळून आल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता लिजी, तिची दोन वर्षीय मुलगी व वसीम हे बेशुद्धावस्थेत आढळून आले.

पोलिसांनी त्यांना तत्काळ पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिघांपैकी दोन वर्षीय मुलगी मृत झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र लिजी आणि वसीम हे दोघे अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल
 करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman attempts suicide with her boyfriend after killing her husband