ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

अपघातानंतर जमाव जमा झाला होता
अपघातानंतर जमाव जमा झाला होता

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअरजवळ रस्ता ओलांडताना रविवारी एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला. यामुळे तुर्भेवासीयांमध्ये महापालिकेविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही अनेक वर्षांपासून पालिकेला या मार्गावर उड्डाणपूल व पादचारी पूल उभारण्यात अपयश आले आहे. त्यामुळे रविवारी या अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तुर्भेवासीयांनी ठाणे-बेलापूर मार्ग रोखून धरला होता; परंतु सुदैवाने पोलिसांनी स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणली.   

ठाणे-बेलापूर मार्गाच्या एका दिशेला तुर्भे रेल्वे स्थानक; तर दुसऱ्या बाजूला तुर्भे स्टोअर ही तब्बल एक लाख लोकसंख्या वसलेली वस्ती आहे. रोज सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, कामाला जाणारे चाकरमानी आणि एमआयडीसीत जाणारा कामगारवर्ग एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला रस्ता ओलांडत असतात. रस्ता ओलांडताना दोन्ही दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनांखाली सापडून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे; तर शेकडो जणांना कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे या मार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल उभारण्याची धावपळ पालिकेने केली. यासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल तयार करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे; परंतु महापालिकेने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार कोणीच कंत्राटदार काम करण्यास तयार नाही. महापालिकेने दोन वेळा राबवलेल्या निविदेला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता उड्डाणपुलाचे काम सध्या गुंडाळल्यात जमा आहे. त्यामुळे तुर्भेवासीयांना जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी पादचारी पुलाऐवजी उड्डाणपूल तयार करावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केली.

नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन 
रविवारी दुपारच्या सुमारास ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअरजवळ रस्ता ओलांडताना ५५ वर्षीय शमिरुनिशा खान यांना भरधाव ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अल्पावधीतच अपघाताची ही वार्ता संपूर्ण तुर्भे परिसरात पसरली. त्यामुळे तुर्भेवासीयांनी रस्त्यावर जमून, प्रशासनाचा निषेध केला. खान यांच्या नातेवाईकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी सुरेश कुलकर्णी यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले.

मागील अनेक वर्षांपासून रस्ता ओलांडताना अपघातात अनेक तुर्भेवासीयांचा जीव गेला. त्यामुळे प्रशासनाने पादचारी पुलापेक्षा उड्डाणपूल तयार करावा; परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने निवडणुका झाल्यावर प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल.
- सुरेश कुलकर्णी, नगरसेवक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com