वैतरणा रेल्वे पुलावरून महिला खाडीत पडली

File Photo
File Photo

मुंबई : वैतरणा रेल्वे पुलावरून, जीव मुठीत घेऊन वैतरणा रेल्वे स्थानकात येत असताना वाढीव गावाच्या 55 वर्षीय महिला पाय घसरून खाडीत पडल्याची घटना गुरुवारी (ता. 1) दुपारच्या सुमारास घडली. स्थानिक गावकऱ्यांनी तात्काळ बोटीच्या माध्यमातून शोध घेऊनही अद्याप महिला सापडली नाही.

गुरुवारी रात्री अंधारामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. शुक्रवारी सकाळी महिलेचा शोध पुन्हा सुरु करण्यात आला मात्र अद्याप महिलेचा शोध लागलेला नाही. बेबी रमेश भोईर (55) असे खाडीत पडलेल्या महिलेचे नाव असून त्या वैतरणा खाडी पलीकडील पालघर हद्दीतील वाढीव गावातील रहिवासी आहेत. बेबी भोईर यांची मुलगी पालघर येथील रुग्णालयात दाखल असल्याने तिला जेवणाचा डबा घेऊन गुरुवारी दुपारी 3.30 ते 4 च्या सुमारास रेल्वे पूल ओलांडून वैतरणा रेल्वे स्थानकात जात होत्या. त्यांच्यासोबत त्यांची नातेवाईक महिलाही होती.

पुलावरून चालत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या खाडीत पडल्या. सोबतच्या महिलेला त्यांना वाचविण्याची संधीही मिळाली नाही. घटना घडताच सोबतच्या महिलेने तिच्या घरच्यांना कळवल्यावर स्थानिक राहिवाशांनी तात्काळ खाडीत बोटी उतरवून सायंकाळी 7 वाजेपर्यंत शोध मोहीम राबविली, पण त्यांचा शोध लागला नाही. शुक्रवारी सकाळपासून वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक नागरिक आणि विरार पोलिस यांच्या माध्यमातून पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली मात्र अद्याप बेपत्ता महिलेचा शोध लागला नसल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक जयेश कंदरकर यांनी दिली आहे.

अबालवृद्धांचा हा प्रवास रोजचाच! 
वाढीव गावाच्या राहिवाशांना वैतरणा 92-93 हा रेल्वे पूल ओलांडूनच वैतरणा रेल्वे स्थानकात यावे लागते, यांना पालघर अथवा मुंबईला जाण्या येण्यासाठी दुसरा मार्गच नसल्याने दररोज सकाळ-संध्याकाळ येथील शाळकरी मुले, जेष्ठ नागरिक, महिला-पुरुष याच वैतरणा पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन जात असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com