चालत्या कारमध्ये तरुणीचा खून?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

मुंबई - दीड महिन्यापासून रहस्यमयरीत्या गायब झालेल्या चार्टर्ड अकाऊंटंट कीर्ती व्यास हिची हत्या मुंबई सेंट्रल येथे अवघ्या सात मिनिटांतच चालत्या कारमध्ये झाल्याचा पोलिसांना संशय आहे. तिचा मृतदेह एसयूव्ही कारच्या डिकीमध्ये टाकल्याचा संशय असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे. ही माहिती पोलिसांनी तपासलेल्या सुमारे ५०० सीसी टीव्हींच्या पडताळणीत उघडकीस आली आहे.

बेपत्ता कीर्ती व्यास हिच्या हत्येप्रकरणी तिचा सहकारी सिद्धेश ताम्हणकर (वय २७) आणि खुशी सेजवानी (४२) यांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्या अटकेनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ५०० हून अधिक सीसी टीव्हींची पडताळणी केली. यात १६ मार्चला सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी मुंबई सेंट्रल येथे नवजीवन सोसायटीजवळ सीसी टीव्हीमध्ये कीर्ती चालकाच्या शेजारील आसनावर बसलेली दिसत आहे. त्यानंतर ९ वाजून २५ मिनिटांनी आग्रीपाडा येथील सातरस्ता परिसरातील सीसी टीव्हींच्या पडताळणीत कीर्ती चालकाच्या शेजारील सीटवर बसलेली नव्हती. तशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे सात मिनिटांत आरोपींनी तिला ठार मारून एसयूव्ही कारच्या डिकीत तिचा मृतदेह ठेवल्याचा संशय आहे.

वडाळ्यात दोन्ही आरोपींमध्ये संभाषण
कीर्तीची हत्या केल्यानंतर १६ मार्चला रात्री वडाळा पोर्ट ट्रस्ट परिसरातील तीन ठिकाणी व वांद्रे समुद्रकिनाऱ्याजवळ आरोपी गरजेपेक्षा जास्त वेळ थांबले होते. याच ठिकाणी त्यांनी कीर्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा पोलिसांना संशय आहे. वडाळ्यात रात्री पावणेनऊच्या सुमारास सिद्धेश व खुशी या दोघांमध्ये दूरध्वनी संभाषणही झाले होते. त्यामुळे वडाळ्यातच तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा जास्त संशय तपास अधिकाऱ्यांना आहे.

Web Title: Woman murdered in a moving car