women day 2023 : रायगडच्‍या लेकींची गगनभरारी Women Day 2023 Raigad district lekkis skyrocket | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृतज्ञा जनार्दन हाले

women day 2023 : रायगडच्‍या लेकींची गगनभरारी

अलिबाग : स्त्रीमध्ये सहनशीलता अधिक आहे. वेगवेगळ्या संकटाशी सामना करण्याचे बळ तिच्यात जन्मजात असल्‍याचे बोलले जाते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्‍या आज प्रत्‍येक क्षेत्रात आपल्‍या कर्तृत्‍वाचा झेंडा रोवून आहेत. रायगड जिल्‍ह्यातील कर्तृत्‍ववान लेकींच्या महिला दिनानिमित्त घेतलेला आढावा...

आकाशाला गवसणी घालणारी कृतज्ञा

कृतज्ञा जनार्दन हाले ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. वडील मासेमारीचा व्यवसाय करतात तर आई गृहिणी. अलिबागमध्ये शालेय शिक्षण घेताना तिने पायलट होण्याचे स्वप्न पाहिले. मुलीच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकांनी आयुष्यभराची जमापुंजी खर्ची घातली.

त्या वेळी रेवदंडामध्ये ना इंटरनेट होते, ना गुगल. अडचणींवर मात करीत २०१३ मध्ये चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारताच्या नागरी उड्डयनचा परवाना मिळवणे, मोठे आव्हान होते. परवाना मिळवण्यासाठी तिला अनेकदा दिल्लीत जावे लागले.

अखेर पाच वर्षांनी तिला परवाना मिळवला. गो एअर या एअरलाइन्स कंपनीत तिने कॅप्टन पायलट म्हणून काम सुरू केले. जिद्द, मेहनतीच्या जोरावर कृतज्ञाने आकाशाला गवसणी घातली आहे.

योगांतून आरोग्‍याबाबत जनजागृतीचा ध्यास

शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहणे काळाची गरज आहे. हे ओळखून अलिबाग तालुक्यातील चोंढी-किहीम येथील ऐश्वर्या रवींद्र समेळ यांनी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे योगाभ्यासाचे शिक्षण घेतले. आपल्या शिक्षणाचा फायदा गावांतील महिला, तरुणींसाठी व्हावा यासाठी पुढाकार घेतला. २०१७ पासून योगा शिकविण्यास सुरुवात केली.

आधी तीन ते चार महिलांना योगांचे धडे दिले. आज पाचशेहून अधिक महिलांना योगा शिकवत आहेत. जिल्ह्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतीत त्‍यांनी प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. नऊ वर्षांपासून ७५ वर्षापर्यंतच्या महिलांना त्‍या योग शिकवतात. अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही समेळ योगाभ्‍यासाचे धडे देत आहेत.

रायगडमधील पहिली मेट्रो पायलट

रायगडमधील पहिली मेट्रो पायलट म्‍हणून रोहा तालुक्यातील यशवंतखर गावातील गार्गी हरेश ठाकूर यांचा लौकिक आहे. मेट्रो लाईन २ए & ७ या मार्गावर तिचे सध्या पोस्टिंग आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन २ए & ७ उद्घाटन करण्यात आले.

त्या वेळी महिला चालक म्हणून गार्गी यांची नेमणूक करण्यात आली होती. पेणच्या के. ई. एस. शाळेत गार्गीचे शिक्षण झाले. त्‍यानंतर नवी मुंबईच्या सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

नंतर मेट्रो कॉर्पोरेशनमध्ये तिची निवड झाली. सर्व बाबी पूर्ण करून तिने मेट्रो पायलट म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मेट्रोमध्ये काम करणे आव्हानात्‍मक आहे. घरच्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच पहिली मेट्रो पायलट म्हणून नाव वेगळ्या वाटेवर चालण्याचे बळ मिळाल्‍याचे ती आवर्जून सांगते.