फेसबुकवर सलमान खानचा मेसेज आला तर सावधान!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 August 2019

फिल्म इंडस्टीमध्ये काम करण्यासाठी लागणारे चाईल्ड आर्टीस्ट कार्ड मिळवून देण्याच्या बहाण्याने अज्ञात आरोपींनी घातला ३८ हजार रुपयांना गंडा 

नवी मुंबई : ऑनलाईन फसवणूक करणाऱया एका टोळीने प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या नावाने घणसोलीतील एका महिलेसोबत मेसेंजरच्या माध्यमातून चॅटींग करुन  तीच्या मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी चाईल्ड आर्टीस्ट म्हणून कार्ड मिळवून देण्याचा बहाणा करुन सदर महिलेला ३८ हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोपरखैरणे पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.  

या घटनेत फसवणूक झालेली महिला ही घणसोली सेक्टर-१ भागात कुटुंबासह रहात आहे. सदर महिला अपंग असल्याने घरीच असतात.  ३ ऑगस्ट रोजी त्या आपल्या मोबाईलवर मेसेंजरचा वापर करत असताना, त्यांना सलमान खानचे प्रोफाईल निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सदर प्रोफाईलवर हाय पाठवले असता, समोरुन त्यांना गुड मॉर्निंग असा मेसेज आला. त्यामुळे साक्षात सलमान खान यानेच आपल्याशी संपर्क साधल्याचा या महिलेचा समज झाला. त्यामुळे सदर महिलेने त्या प्रोफाईलवर नियमित चॅटींग करण्यास सुरुवात केली. या चॅटींग दरम्यान त्यांनी, आपली मुलगी श्रावणी हि चांगली ऍक्टींग करत असल्याची माहिती देतानाच श्रावणीने टीकटॉकवर बनविलेले व्हीडीओ सुद्धा त्या प्रोफाईल वर पाठवून दिले.  

त्यामुळे सलमान खानच्या नावाने सदर महिलेशी चॅटींग करणाऱया व्यक्तीने मेसेंजरद्वारे श्रावणीची अधिक माहिती जाणून घेऊन श्रावणीचे चाईल्ड आर्टीस्ट कार्ड बनवावे लागेल असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांचा मोबाईल नंबर मागून घेऊन त्याचा मॅनेजर अमर भटोला हा त्यांच्याशी संपर्क साधेल असे सांगितले. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी अमर भटोला याने सलमान खानचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून या महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधून श्रावणीचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो,जन्म दाखला, शाळेचे ओळखपत्र व्हॉट्सऍपवर पाठविण्यास सांगितले.  

त्यानुसार त्या महिलेने सर्व कागदपत्रांचे फोटो पाठवून दिल्यावर दुसऱयाच दिवशी अमर भटोला याने सदर महिलेला श्रावणीचे पासपोर्ट तयार झाल्याचे सांगून त्यांना विविधकारणास्तव कधी १२ हजार रुपये  तर कधी १० हजार रूपये व १६ हजार रूपये जमा करण्यासाठी त्यांना अकाऊंट नंबर पाठवून दिला. एवढे पैसे दिल्यानंतरही लॅपटॉप व मोबाईल खरेदी करण्याकरिता आणखी १६ हजार रूपये पाठवण्यास सांगितले असता सदर महिलेने पैसे पाठविले नाही. त्यामुळे भामटा अमर भटोला याने महिलेला फोन करून श्रावणीचे चाईल्ड आर्टिस्ट कार्ड आणि पासपोर्ट रद्द झाल्याचे सांगून महिलेशी संपर्क तोडला. 

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पतीसह कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून झालेल्या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women get cheated on facebook with name of salman khan in mumbai