गर्भपिशवी अवैधरीत्या काढल्यास कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

अवैधरीत्या आणि अनावश्‍यक शस्त्रक्रिया करून महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या डॉक्‍टर आणि रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली.

मुंबई - अवैधरीत्या आणि अनावश्‍यक शस्त्रक्रिया करून महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या डॉक्‍टर आणि रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली.

बीड जिल्ह्यात अवैधरीत्या शस्त्रक्रिया करून विशेष ऊसतोड करणाऱ्या महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालयांविरोधी कारवाईची मागणी करणारा तारांकित प्रश्न शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला.

याला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात राज्यस्तरावर "एसओपी' अर्थात प्रमाणित कृती समिती स्थापन केले जाईल, असे सांगितले. या कृतीदलात महिला आमदार, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आरोग्य विभागाच्या प्रधानसचिवांचा समावेश असेल. ही कृती समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करेल. यात दोषी असलेल्या सगळ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोन वेळा ऊसतोडणी महिला कामगारांची तपासणी केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Illegal Miscarriage Crime Eknath Shinde