नागपाड्यात विवाहितेची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

पती गंभीर; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

पती गंभीर; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई - विवाहितेची हत्या करून तिच्या पतीला गंभीर जखमी केल्याचा प्रकार नागपाडा येथे उघडकीस आला. चाळीतील घरात समीरा दळवी (40) मृतावस्थेत आढळली, तर तिचा पती जुल्फीकार दळवी (46) मृतदेहाशेजारी रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी जुल्फीकारवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपाडा पोलिसांनी समीराच्या हत्येप्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

फोरास रोडवरील बच्चूवाडीतील साऊथ फेसिंग चाळीच्या तळमजल्यावरील घरात हा प्रकार घडला. जुल्फीकार हा कुलाब्यातील हॉटेलमध्ये व्यवस्थापक आहे. सकाळी 10 वाजता तो नेहमी वाडीच्या प्रवेशद्वारावर भाऊ अब्दुल माजिद याच्या पानाच्या टपरीवर बसतो. सकाळी जुल्फीकार न आल्याने दुपारी 12 वाजता माजिद त्याच्या घरी गेला. त्या वेळी समीरा आणि जुल्फीकार रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घाबरलेल्या माजिदने तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहचले, त्या वेळी समीराचा मृत्यू झाला होता. मात्र जुल्फीकार जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती पोलिस उपायुक्त (परिमंडळ- 3) प्रवीण पडवण यांनी दिली. समीराच्या पोटावर आणि हातावर तीक्ष्ण हत्याराचे घाव आहेत, तर जुल्फीकारच्या पोटावर जखमा आहेत. त्यांच्या घरात कोणी तरी जबरदस्तीने घुसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालेले नाही.

जुल्फीकार व समीराला तीन मुले आहेत. त्यातील मोठा मुलगा बंगळुरूमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दुसऱ्या मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली असून मुलगी नववीला आहे. घटना घडली त्या वेळी मुले घरी नव्हती. समीरा आणि जुल्फीकारचे अधूनमधून भांडण होत असे. त्यामुळे मंगळवारी पहाटे त्यांच्यात भांडण झाले होते का, याचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: women murder in nagpada