एकतर्फी प्रेमातून विवाहितेची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

ठाणे - एकतर्फी प्रेमातून घरात शिरून 32 वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या करणाऱ्या तरुणाला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.मृणाल घाडीगावकर असे मृत विवाहितेचे नाव आहे; तर अतुल कमलेश (वय 21) रा. दिवा गाव असे आरोपीचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दिव्यात महिलेच्या राहत्या घरी घडली असून शेजाऱ्यासमोर या हत्येचा थरार सुरू असतानाही पीडितेला कुणीही वाचवू शकले नाही.

दिवा गावात मृत महिला मृणाल घाडीगावकर ही आपल्या पतीसह काही वर्षांपूर्वीच राहायला आली होती. तिचा पती खासगी कंपनीत नोकरी करतो. मृणाल देखणी असल्याने त्याच परिसरातच राहणारा मोबाईल रिपेअरिंगचे काम करणाऱ्या अतुलचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले होते; मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. तिच्या दिराशीच तिचे सूत जुळल्याचा संशय अतुलला येऊ लागला. या संशयातून अतुलने सोमवारी दुपारी घरात शिरून स्वयंपाक घरात एकटी असलेल्या मृणालवर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने मृणाल आरडाओरड करीत घराच्या दिवाणखान्यात आली. तिचा आवाज ऐकून शेजारीपाजारी धावून आले; पण दरवाजा आतून बंद असल्याने कोणीही तिला वाचवू शकले नाही. दरम्यान, स्थानिकांनी मुंब्रा पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी आरोपी अतुल याला अटक केली असल्याची, माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी दिली.

Web Title: women murder in thane