अंधेरी आरटीओ कार्यालयात महिलांची कुचंबणा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

आरटीओ कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे; तसेच दररोज अनेक महिला कामासाठी येथे येतात. इमारतीच्या दोन्ही भागांत प्रत्येक मजल्यावर प्रसाधनगृहे आहेत; परंतु बहुतेक प्रसाधनगृहे बंदच आहेत. 

मुंबई - अंधेरी आरटीओ कार्यालयातील महिलांसाठीची बहुतेक प्रसाधनगृहे बंद आहेत. त्यामुळे महिला कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे. स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कंपनीने मध्येच काम सोडून दिल्यामुळे इमारतीचा उकिरडा झाला आहे. 

अंधेरी आरटीओ कार्यालयात पुरुषांसाठी 20 आणि महिलांसाठी 16 प्रसाधनगृहे आहेत. त्यापैकी बहुतेक प्रसाधनगृहे कुलूपबंद आहेत. या कार्यालयाला 2012 मध्ये स्व-मालकीची इमारत मिळाली. त्यानंतर सात वर्षांतच इमारतीची दुरवस्था झाली आहे. आरटीओ कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे; तसेच दररोज अनेक महिला कामासाठी येथे येतात. इमारतीच्या दोन्ही भागांत प्रत्येक मजल्यावर प्रसाधनगृहे आहेत; परंतु बहुतेक प्रसाधनगृहे बंदच आहेत. 

इमारतीच्या आतील भागातच जप्त केलेल्या रिक्षा गंजलेल्या स्थितीत धूळ खात पडल्या आहेत. इमारतीमधील जिन्यांचे प्लास्टर पडले आहे. देखभाल, साफसफाई होत नसल्याने उघड्या असलेल्या प्रसाधनगृहांसह संपूर्ण कार्यालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. साफसफाईसाठी चमनकर कंपनीला सात वर्षांचे कंत्राट देण्यात आले होते; परंतु हा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच या कंपनीने काम सोडल्याचे सांगण्यात आले. 

दोन लिफ्ट बंद 
अंधेरी आरटीओ कार्यालयाच्या चारमजली इमारतीत तीन लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकच लिफ्ट सुरू असून, दोन लिफ्ट बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना जिन्यावरून चार मजले चढावे-उतरावे लागत आहेत. 

इमारतीच्या साफसफाईसाठी कोणीही नसल्यामुळे अडचण होत असली, तरी सर्व प्रसाधनगृहे सुरू आहेत. एक लिफ्ट नागरिकांसाठी पुरेशी आहे. 
- अभय देशपांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी 

सर्व मजल्यांवर प्रसाधनगृहे असली, तरी बहुतेक बंदच आहेत. त्यामुळे महिलांना अनेकदा तळमजल्यावरील अस्वच्छ प्रसाधनगृहाचा वापर करावा लागतो आहे. 
- अंजली आव्हाड, नागरिक 

Web Title: Women toilet closed at Andheri RTO office