डोंबिवलीत महिलांचे 26 जानेवारीला उपोषण

 1523520314.jpg
1523520314.jpg

कल्याण : डोंबिवली लगतच्या औद्योगिक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांकडे कोणत्याही सरकारी यंत्रणेचे लक्ष नसल्याने तेथील महिलांनी 26 जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार साकडे घालूनही कोणताही बदल न घडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून तसेच ट्विटरद्वारे अडचणी सांगूनही या ठिकाणी काही सुधारणा होत असताना दिसत नसल्याने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मागील दहा वर्षांपासून औद्योगिक निवासी विभागात रस्त्यांची कोणतीही कामे करण्यात आलेली नाहीत. पाणीपुरवठ्यातही कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. कचरा तसेच आरोग्य समस्याही या परिसरात जैसे थे आहेत. यावर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात यासाठी स्थानिक रहिवाशांनी वारंवार कल्याण-डोंबिवली पालिका तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. पालिका क्षेत्रात येऊन तीन वर्ष झाल्यानंतरही यात बदल न झाल्याने स्थानिक नगरसेवक आमदार तसेच खासदार यांच्याकडेही या समस्या मांडण्यात आल्या. त्यावर आश्वासनापलीकडे काहीही उत्तर मिळू शकलेले नाही. 26 ऑक्टोबर 2018 ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या गोष्टींची पत्राद्वारे माहिती देण्यात आली. ठाकरे यांना ट्विट करूनही या भागातील रस्ते तसेच मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाल्याचे सांगण्यात आले होते. पालिका मालमत्ता कराच्या रकमेची बिले पाठवते मात्र कोणत्याही सोयी सोयी सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचे पालिका प्रशासनासही कळवण्यात आले होते. पालिका क्षेत्रात आलेल्या 27 गावांमध्ये विविध अनुदानाद्वारे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र औद्योगिक क्षेत्रातील निवासी भागासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

सोयी-सुविधा नसल्याने कर भरणा करण्यात येणार नाही अशी भूमिका ही या परिसरातील रहिवाशांनी घेतली होती. त्याचप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधींना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत इशाराही देण्यात आला होता. परंतु कोणत्याही सरकारी यंत्रणेने या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत नसल्याने मिलापनगर परिसरातील महिला 26 जानेवारीला पालिका कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 2015 मध्ये हा परिसर पालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला. त्याचवेळी येथील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पालिकेकडे आली. मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे पालिका प्रशासन आणि औद्योगिक मंडळ यांच्या पत्र व्यवहार होत राहिल्याने येथील कामे प्रलंबित राहिली. मागील दहा वर्षात या परिसरातील रस्त्यांची कामे होऊ शकलेली नाहीत. पालिकेच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे नव्याने रस्ते बांधणी शक्य नसल्याने पालिका प्रशासनाने या परिसरातील खड्डे भरण्याचे काम केले. 
     
''या भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे धुळीची समस्या फार मोठी आहे. धुळीमुळे सर्व वयोगटातील नागरिकांना वारंवार खोकला, दमा तसेच इतर श्वसन विकार, डोळ्यांचे आजार होतात. मागील 10 वर्षांमधील येथे रस्त्यावर केवळ पॅचवर्कची कामे  केली जातात. त्यामुळे काही दिवसातच रस्त्याची अवस्था पूर्वीसारखीच होते.''
 - नीलम लाटकर,  गृहिणी                      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com