ऐरोलीतील आंबेडकर स्मारकाचे काम संथगतीने!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

महापरिनिर्वाण दिन दोन दिवसांवर आला असतानादेखील ऐरोलीतील आंबेडकर स्मारकाचे कामे रखडलेले आहे. याबाबत सर्वच राजकीय नेते मूग गिळून गप्प बसले आहेत. यामुळे अनुयायांनी याबाबत संताप व्यक्त केला. 

नवी मुंबई : ऐरोलीतील आंबेडकर स्मारकाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे; मात्र सद्यस्थितीत दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे; तर मागील काही महिन्यांपासून स्मारकाचे काम हे बंदच असल्याचे पाहायला मिळत आहे. या स्मारकाच्या कामावरून निवडणूक काळात अनेकदा लोकप्रतिनिधींनी गदारोळ केला; तर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दौरे करून प्रसिद्धी मिळवली; मात्र महापरिनिर्वाण दिन दोन दिवसांवर आला असतानादेखील स्मारकाचे कामे रखडलेले आहे. याबाबत सर्वच राजकीय नेते आता मूग गिळून गप्प बसले आहेत. यामुळे अनुयायांनी याबाबत संताप व्यक्त केला. 

ऐरोली, सेक्‍टर १५ मधील भूखंड क्रमांक २२ ए येथे नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला ६ एप्रिल २०११ मध्ये सुरुवात करण्यात आली. ५ एप्रिल २०१३ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. या स्मारकासाठी पालिकेकडून १२ कोटी ८४ लाख आणि आमदार निधीतून ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. कामात उशीर झाल्याने स्मारकाच्या खर्चात वाढ होऊन, तो २५ कोटी ८२ लाखांपर्यंत गेला आहे. दोन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ऑक्‍टोबर २०१७ मध्ये पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले. यानंतर माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या महापौरपदाच्या अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने तत्परतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्यातील स्मारकाचे उद्‌घाटन करण्यात आले; तर अजूनही दुसऱ्या टप्प्यातील काम सुरूच आहे. त्यामुळे या स्मारकाला भेट दिल्यांनतर अनुयांयाना बघण्यासारखे काहीच नसल्याने, त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

राजकीय श्रेयानंतर नेत्यांची पाठ
दोन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, मागील नऊ वर्षांपासून काम सुरूच असल्याने अनुयायांनी नाराजी व्यक्त केली. स्मारकासाठी आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी पाहणी दौरा करत राजकीय श्रेय घेतले; मात्र कोणताच राजकीय पक्षाचा नेता आता स्मारकाकडे फिरकत नसल्याचे निदर्शनास येत आहे. 

स्मारकाचे काम सुरू होऊन जवळपास एक दशक पूर्ण व्हायला आले. आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी स्मारकाच्या कामांचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केला. स्मारकाच्या अंतर्गत सजावटीमधील कोणत्याही गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत.
- सागर कांबळे, रहिवासी. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर स्मारकात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची तात्पुरती व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. लवकरच आयआयटी मुंबई यांच्यामार्फत बांधकाम परीक्षण करून तोडगा काढला जाईल. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work of the Ambedkar Memorial in airoli is slow!