
Mumbai News : 15 ते 20 फुटावरुन खाली पडल्याने कामगाराचा मृत्यु
डोंबिवली – कल्याण पश्चिमेत स्मार्ट सिटी अंतर्गत पिलर उभारणीचे काम सुरु आहे. पश्चिमेत स्मार्ट सिटी अंतर्गत पिलर उभारणीचे काम सुरु आहे. 26 जानेवारीला रात्री काम सुरु असताना कामगार पिंटू कुशवाह (वय 31) या कामगाराचा 15 ते 20 फुटावरुन खाली पडल्याने मृत्यु झाला होता.
याप्रकरणी महिनाभरानंतर महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात कंत्राटदार प्रेमशंकर मिस्त्री (वय 52) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण स्टेशन परिसरात उड्डाणपूलाच्या पिलर उभारणीचे काम सुरु आहे.
गेस्ट हाऊस जवळ 13 नंबरच्या पिलरचे काम जानेवारी महिन्यात सुरु होते. 26 जानेवारीला रात्री 1.45 वाजता पिंटू कुशवाह हा सदर ठिकाणी काम करत होता. काम सुरु असताना त्याच्या हातातील मेजरमेंटची टेप हातातून जाळीवर पडली.
टेप घेण्यासाठी जाळीवरुन तो चालत जात असताना त्याचा तोल गेला. जाळी फाटल्याने पिंटू हा 15 ते 20 फूट उंचीवरुन खाली रोडवर पडला. त्याच्या डोक्याला मुक्का मार लागून कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.
पिंटूला उपचारासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. महिनाभरानंतर याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात ठेकेदार प्रेमशंकर सुंदर प्रसात मिस्त्री या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिस्त्री यांची हयगय व निष्काळजीपणा वर्तन पिंटू यांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याचा आरोप मिस्त्री याच्यावर करण्यात आला आहे. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.