कार्यकर्त्यांच्या खऱ्या कामाला सुरुवात 

कार्यकर्त्यांच्या खऱ्या कामाला सुरुवात 

उल्हासनगर - यंदाच्या पालिका निवडणुकीत उल्हासनगरमध्ये बरीच राजकीय उलथापालथ झाल्याने इथल्या लढती चुरशीच्या ठरणार आहेत. येथे नेमकी कोण बाजी मारणार याबाबत मुंबईच्या राजकीय वर्तुळातही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवसात राजकीय पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी रविवार आणि सोमवारची रात्र ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे. रातोरात सूत्रे हलवून बाजी उलटवता येऊ शकते, हे राजकारणातल्या धुरंधरांना चांगलेच उमगले आहे. त्यानुसार वरिष्ठ फळीतील नेते मंडळी "रात्र वैऱ्याची आहे' असे सांगून कार्यकर्त्यांना "जागते रहो...' सांगत कानोकान पोहोचणार नाहीत, अशा सूचना देत आहेत. 

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकारणातले डावपेच आखले जातात. त्यासाठी अखेरच्या रात्री महत्त्वाच्या ठरतात. रात्री आखले जाणारे बेत आणि त्याची अंमलबजावणी करणारे कार्यकर्तेही वेगळेच असतात. रात्रीच्या शांततेत कामगिरी फत्ते करणाऱ्यांना अशा वेळी चांगलेच महत्त्व असते. यासाठी खास अनुभवी कार्यकर्त्यांना आमंत्रण धाडले जाते. मंगळवारी मतदान होत असल्याने विशेषतः रविवार आणि सोमवारची रात्र महत्त्वाची असल्याने विरोधी पक्षाच्या हालचालींवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. अधिकाधिक मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न याच शेवटच्या रात्रीत केला जातो. पक्षाच्या एकीकडे गुप्त बैठका होत असतात आणि रातोरात खलिते, संदेश, आदेश जारी होऊन बाजी उलटवण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरू होतो. फंद फितूरीसाठी हिरव्याकंच नोटांचा वापर व्हायचा; परंतु यंदा रात्रीच्या अंधारात "गुलाबी' रंग कुठे उधळला जातोय, यावर खबरी कार्यकर्त्यांची पथके विशेष नजर ठेवून कुठे काय चालले आहे याची खबरबात वरपर्यंत तातडीने पोहोचवतात. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या फौज तयार असतात. प्रचाराची मुख्य मदार कार्यकर्त्यांवर असली, तरी मतदानाच्या आदल्या दोन-तीन रात्रीत कार्यकर्त्यांचे खरे कसबपणाला लागते. 

काय होते रात्री? 
वरिष्ठांच्या गुप्त बैठका 
विरोधकांच्या हालचालींवर नजर 
फंद-फितूरीला जोर 
मतदारांना वळवण्याचा अखेरचा प्रयत्न 
संदेश, आदेशांचे आदान-प्रदान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com