वर्षाला ३६ हजारांचा धूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

सिगारेटचे अतिव्यसन असलेल्या व्यक्ती रोज १०० ते १५० रुपये धुरात उडवतात. म्हणजेच त्यांचे वर्षाला सरासरी ३६ हजार रुपये धूम्रपानाच्या व्यसनावर खर्च होतात. एवढ्या पैशांत चौकोनी कुटुंबाचे दीड वर्षाचे वाणसामान भरता  येऊ शकते. 

मुंबई - मुंबईतील अनेक तरुण वयाच्या १७-१८ व्या वर्षीच धूम्रपानाच्या आहारी जात आहेत. दिवसाला सरासरी ८ ते १० सिगारेटचा धूर शरीरात जात असल्याने तिशी गाठण्यापूर्वीच अनेकांना आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहेत. मोठ्या प्रमाणावर विडी ओढणाऱ्या व्यक्ती त्यासाठी दिवसाला ३० ते ५० रुपये खर्च करतात.

सिगारेटचे अतिव्यसन असलेल्या व्यक्ती रोज १०० ते १५० रुपये धुरात उडवतात. म्हणजेच त्यांचे वर्षाला सरासरी ३६ हजार रुपये धूम्रपानाच्या व्यसनावर खर्च होतात. एवढ्या पैशांत चौकोनी कुटुंबाचे दीड वर्षाचे वाणसामान भरता  येऊ शकते. 

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त ‘टीम सकाळ’ने शहरातील ११ ठिकाणी सिगारेट आणि विड्या ओढणाऱ्यांशी संवाद साधला. त्यापैकी ८५ टक्के जणांनी वयाच्या १७-१८ व्या वर्षी सिगारेटची सवय लागल्याचे सांगितले. ४० टक्के व्यक्ती दिवसाला किमान पाच सिगारेट ओढत असल्याचे पाहणीत आढळले. ६० टक्के व्यक्तींनी दिवसाला किमान ८-१० सिगारेट ओढत असल्याचे सांगितले. विडी ओढणाऱ्यांची संख्याही कमी नाही. दिवसाला दीड ते दोन बंडल विडी ओढत असल्याचे काही जणांनी सांगितले.  

‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून सिगारेटचा कश 
सिगारेटचे अतिव्यसन असलेल्या व्यक्ती रोज १०० ते १५० रुपयांच्या सिगारेट ओढतात. ताण हलका करण्यासाठी, एकटेपण दूर करण्यासाठी, मित्रांमध्ये उठून दिसण्याकरिता किंवा ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणूनही तरुण सिगारेटचा ‘कश’ घेत असल्याचे ‘टीम सकाळ’ने जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त केलेल्या पाहणीत उघड झाले आहे. 

‘पॅसिव्ह स्मोकिंग’ही घातक 
धूम्रपान करणाऱ्यांच्या आसपास असणाऱ्यांनाही सिगारेट-विडीच्या धुराने आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता असते. त्यालाच ‘पॅसिव्ह स्मोकिंग’ असे म्हटले जाते. धूर श्‍वासाद्वारे शरीरात गेला की त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.  

भारतात दरवर्षी तंबाखूशी संबंधित आजारांमुळे १० लाखांहून अधिक मृत्यू होतात. समुपदेशन वा दुष्परिणामांबाबत जनजागृती करून तंबाखूचे व्यसन कमी करण्याचे प्रयत्न करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
- डॉ. संजय दुधाट, सर्जिकल ऑन्कोलोजी, नानावटी रुग्णालय, पार्ले 

एखादी व्यक्ती सलग २० वर्षांपासून सिगारेट ओढत असल्यास तिला ‘सीओपीडी’ होऊ शकतो. धूम्रपान करणाऱ्या ५० ते ६० टक्के व्यक्तींना ‘सीओपीडी’ होताे आणि तो आजार पूर्ण बरा होत नाही. त्यावर नियंत्रण मिळवता येते.‘सीओपीडी’च्या रुग्णांना ‘पल्मनरी रिहॅबिलिटेशन’चा सल्ला दिला जातो. 
- डॉ. राजरतन सदावर्ते, छातीविकारतज्ज्ञ, कोहिनूर रुग्णालय, कुर्ला 

अतिधूम्रपानामुळे मेंदूला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी ब्रेन स्ट्रोक, अर्धांगवायू किंवा स्मृतिभ्रंश होण्याची भीती असते. धूम्रपानाच्या व्यसनामुळे २५-३० वयोगटातील तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकचे परिणाम वाढले आहे.
- डॉ. नितीन डांगे, न्यूरोसर्जन, केईएम रुग्णालय, परळ

अनेकांना वयाच्या पंधराव्या वर्षी सिगारेटचे व्यसन जडते. ते पंचविशीपर्यंत कायम राहिल्यास तोंडाला चट्टे येणे, भूक मंदावणे आदी तक्रारी सुरू होतात. तिशीपर्यंत व्यसन कायम राहिल्यास प्रजननक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. त्यांची शरीरसुख घेण्याची इच्छाही कमी होऊ शकते.
- डॉ. अभय चौधरी, मायक्रोबायोलॉजिस्ट, डी. वाय. पाटील रुग्णालय, नेरूळ

‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून किंवा अनेकदा वडीलधाऱ्यांचे पाहून पहिली सिगारेट ओढली जाते. नंतर ती सवय बनते. महाविद्यालयात असताना लागलेली सिगारेटची चटक व्यसनाचे रूप धारण करते. 
- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचारतज्ज्ञ

तंबाखूसेवनाचे दुष्परिणाम
 धूम्रपानामुळे सात हजार विषारी रसायनांशी संपर्क येतो. ज्यात ७० घटक कार्सिनोजेनिक असून, ते अवयवांचे नुकसान करतात
 मूत्रपिंडे निकामी होणे, आतड्यांमधील रक्त कमी होणे आणि हायपरटेन्सिव्ह हृदयविकार असे तंबाखूचे धोके नव्याने आढळून आले आहेत
 धूम्रपान करणाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. तुम्हाला दमा असेल तर तुम्हाला दम्याचा झटका वारंवार येऊ शकतो. त्याचप्रमाणे खोकला आणि कफ होतो
 धूम्रपानामुळे त्वचा कोरडी आणि पिवळी पडते.
 तुमच्या स्नायूंमध्ये रक्त आणि ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होते.
 फुफ्फुसांचा कर्करोग हा पुरुषांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असणारा मोठ्या प्रमाणावर आढळणारा घटक आहे.

गंभीर आजार 
  ब्रॉन्कायटिस 
आणि अस्थमा
 घसा-अन्ननलिका-फुप्फुसाचा कर्करोग
 फुप्फुसाचा कर्करोग होणाऱ्यांपैकी ६०-७० टक्के रुग्ण धूम्रपान करणारे
 धूम्रपान करणाऱ्यांना सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा इतर प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका अधिक
 ब्रेनस्ट्रोक, प्रजननक्षमतेवर परिणाम आणि अर्धांगवायू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Tobacco Day Special