रायगडचा तरुण सायकलवरून जगप्रवासाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

क्षीतिज रोज 50 ते 60 किलोमीटर सायकल चालवण्याचा सराव करत आहे. या मोहिमेसाठी त्याने आतापर्यंत 56 देशांचा व्हिसा मिळवला असून, अन्य देशांचा व्हिसा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अलिबाग : तालुक्‍यातील नागलोली येथील एका तरुणाने सायकलवरून तीन वर्षांत 75 देशांचा प्रवास करण्याचा संकल्प सोडला आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्टला मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून तो या मोहिमेवर रवाना होईल. 

गिर्यारोहक असलेल्या क्षीतिज विचारे याने अनेक साहसी मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. तो आशिया, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका या चारही खंडांमधील बांगलादेश, म्यानमार, चीन, जपान, इराण, तुर्कस्तान, अमेरिका, इंग्लंड आदी तब्बल 75 देश सायकलवरून फिरणार आहे. या मोहिमेत त्याला दिवसाला 100 ते 125 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. 

तीन वर्षांनी फ्रान्समधील पॅरिस येथे जगप्रसिद्ध आयफेल टॉवरजवळ त्याची ही मुलुखगिरी पूर्ण होईल. क्षीतिज रोज 50 ते 60 किलोमीटर सायकल चालवण्याचा सराव करत आहे. या मोहिमेसाठी त्याने आतापर्यंत 56 देशांचा व्हिसा मिळवला असून, अन्य देशांचा व्हिसा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
क्षीतिजने यापूर्वी भारताच्या किनारपट्टीवरून सायकल प्रवास केला होता. त्या प्रवासाचीही सुरुवात त्याने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथूनच केली होती. 

कन्याकुमारी, केरळ, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल आणि नंतर भारताची सीमा ओलांडून त्याने भूतानवरून नेपाळमधील एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पची मजल गाठली होती. क्षीतिजने मुंबई-गोवा, मुंबई-पुणे, मुंबई-कन्याकुमारी, पुणे-हंपी अशा सायकल मोहिमा यशस्वी केल्या आहेत. वयाच्या सातव्या वर्षापासून सायकलिंगचे वेड असलेल्या क्षीतिजने दिवेआगर महाविद्यालयातून बी. कॉम. पदवी मिळवली आहे. 

मदतीचे आवाहन 
क्षीतिजची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्याचे आईवडील शेती करतात. त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. या तीन वर्षांच्या सायकल मोहिमेसाठी त्याला 75 लाख रुपये खर्च येईल. त्याला मुरूडमधील पिस्न्वेअर एज्युस्पोर्टस फाऊंडेशन सहकार्य करत आहे. क्षीतिजला आर्थिक मदत देण्यासाठी या संस्थेचे अध्यक्ष प्रसाद चौलकर 8169068492 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World tour from Raigad's young bicycle