डोंबिवलीकरांनी अनुभवली मातीच्या आखाड्यातील जंगी कुस्त्यांची धम्माल

संजीत वायंगणकर
सोमवार, 9 एप्रिल 2018

सध्या मातीच्या कुस्तीची जागा मॅटवरील कुस्तीने घेतलेली असताना डोंबिवलीत मात्र मातीच्या आखाड्यातील कुस्ती सामने खेळवले जातात. विजेत्याला मानाची गदा आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येतं.

डोंबिवली - डोंबिवलीच्या मोठा गाव देवीचा पाडा जत्रेत गावदेवी मंदिर संस्थानतर्फे मातीतल्या कुस्तीचे सामने रविवारी सायंकाळी खेळवण्यात आले. या कुस्ती स्पर्धेला अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या कुस्ती दंगल साठी यंदा देशभरातून नामांकित मल्लांनी हजेरी लावून आपले कुस्ती कौशल्य दाखविले. त्यांच्या थरारक खेळाने प्रेरीत होऊन नवीन पिढी या मैदानी खेळाकडे वळेल असा विश्वास आयोजक पुंडलिक म्हात्रे यांनी व्यक्त केला.

डोंबिवलीच्या मोठागाव भागात सध्या मोठी जत्रा भरली असून दोन दिवस चालणाऱ्या या जत्रेत महिला व दिव्यांग कुस्तीगीरांच्या कुस्तीचे सामने हे प्रमुख आकर्षण होते. विशेष म्हणजे सध्या मातीच्या कुस्तीची जागा मॅटवरील कुस्तीने घेतलेली असताना डोंबिवलीत मात्र मातीच्या आखाड्यातील कुस्ती सामने खेळवले जातात. विजेत्याला मानाची गदा आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येतं. ही स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी मोठागावात केली होती. माहिलांच्या चुरशीच्या ठरलेल्या एका लढतीत ठाण्याच्या महाविद्यालयीन राष्ट्रीय वा राज्य स्तरावर खेळलेल्या खेळाडूने कल्याणच्या भाग्यश्री गडकरला चीतपट करुन 5555 रुपये रोख व चषक हे बक्षिस पटकावले. दुसऱ्या एका लढतीत देवीचा पाडा येथील स्थानिक मल्ल अक्षय भोईर याने चांगले डावपेच वापरुन कोल्हापूरच्या राज माने यास आसमान दाखविले.
 
Wrestling

शनिवारी सकाळ पासून यात्रा उत्सवास सुरवात झाली. गावदेवी व्याघ्राई देवीची ओटी भरुन दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.वर्षभर देवीमातेचे सर्व सण व उत्सवांना सचिन म्हात्रे, नानी म्हात्रे व बंडू म्हात्रे हे तीन भगत (पुजारी) पारंपारिक पध्दतीने पूजाअर्चा करतात. सायंकाळी मानकरी दिपेश म्हात्रे यांच्या हस्ते देवीची पूजा संपन्न होऊन पालखी उत्सवास सुरवात झाली.गावदेवी मंदिर संस्थानचे सर्व विश्वस्त व मोठा गाव देवीचा पाडाचे ग्रामस्थ यांनी यंदाचा यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष पुंडलिक म्हात्रे व शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Wrestling in sand at Dombivli Mumbai