चुकीची धोरणे उद्योगांच्या मुळावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

स्थलांतर अवघड 

  • स्थलांतराने प्रश्‍न सुटणार नाही 
  • चुकीच्या धोरणांचा उद्योगांवर परिणाम 
  • आधी कारखाने आले लोकवस्ती नंतर 
  • उद्योजकांना विश्‍वासात घ्यायला हवे 
  • पालिकेकडून सुविधा मिळत नाहीत

कल्याण - नवीन उद्योग यावेत यासाठी सरकार पायघड्या घालते आणि एखादा अपघात घडला की उद्योगांच्या स्थलांतराच्या गोष्टी केल्या जातात. सरकारच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम उद्योगांवर होतात, असे मत कल्याण-डोंबिवली मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे (कामा) अध्यक्ष संजीव कटेकर यांनी व्यक्त केले. डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटानंतर पहिल्यांदाच उद्योजकांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. 

पालिकेच्या महासभेने सोमवारी या परिसरातील रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे; मात्र हे उद्योग स्थलांतरित करून प्रश्‍न सुटणार नाहीत. सरकारच्या चुकीच्या धोरणाचे परिणाम उद्योगांवर होतात, असे ते म्हणाले. या भागात कारखाने आले त्या वेळी निवासी परिसर नव्हता; मात्र कालांतराने लोकवस्ती आली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला त्या वेळी बफर झोन सुरक्षित राखता आला नाही. येथे झालेली बेकायदा बांधकामे थांबवता आली नाहीत. या सर्वांचे परिणाम स्वाभाविकपणे उद्योगांना सोसावे लागत असल्याचे संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी सांगितले. आज 30-40 वर्षांनंतर हे उद्योग स्थलांतरित करणे अत्यंत अवघड आहे. वीज तसेच पाणीपुरवठा, कामगारांच्या सुविधा, मालाची ने-आण करण्यासाठी आवश्‍यक असणारे रस्ते, वाहने याची व्यवस्था या नव्या जागी कशी उपलब्ध होऊ शकेल, असा प्रश्‍न या वेळी विचारण्यात आला. शून्य अपघात हा प्रत्येक कारखान्याचा उद्देश असतो; मात्र अपघात झाल्यास त्याला पूर्णपणे मालकच जबाबदार, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे मत या वेळी मांडण्यात आले. 

प्रोबेसचा अपघात झाल्यानंतर नेत्यांनी कारखाने हलवण्याचा विचार बोलून दाखवला; मात्र ज्या वेळी पालिकेने ठराव केला त्यापूर्वी कारखानदारांना विश्‍वासात घ्यायला हवे होते, असेही या उद्योजकांनी बोलून दाखवले. पालिकेला मालमत्ता कर, पाणी शुद्धीकरणाचा कर असे सर्व कर उद्योगांकडून दिले जातात. तरीही कारखान्याबाहेर पडलेले डेब्रिज उचलण्यासाठी पाठवलेल्या पत्राला पालिकेने आश्‍चर्यकारक उत्तर दिले आहे. कारखान्यांनी हे डेब्रिज स्वतः उचलावे. न उचलले गेल्यास कारखान्यांकडून पाच ते 25 हजारांचा दंड वसूल केला जाईल, असे कळवले जाते. शनिवारी प्रोबेस अपघातातील मृतांसाठी शोकसभा घेण्यात येणार आहे. कारखान्यातील सुरक्षिततेसाठी या वेळी एक वचन उपस्थितांकडून घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत मुकुंद देव, नंदकुमार भागवत, अभय पेठे, श्रीकांत जोशी या माजी अध्यक्षांसह विद्यमान अध्यक्ष कटेकर, उपाध्यक्ष मुरली अय्यर उपस्थित होते.

    Web Title: Wrong policies are hurting business in state